छत्रपती संभाजीनगर, दि.23 (विमाका) : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कन्नड तालुक्यातील अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी बाबत माहिती जाणून घेत आदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसेच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
अंबाळा ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, प्रलंबित वनहक्क दावे, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिक्षण, शाळेसाठी संरक्षण भींत, ग्रामविकास, जन्मप्रमाणपत्र, बिबट्यांचा त्रास आदीं बाबत आपल्या अडचणी मांडल्या, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासोबतच योजना मंजूर असून अर्धा किलोमीटर या ठिकाणी भूमिगत पाईपलाईनचे काम करण्यासाठी वन विभागाची मंजुरी मिळण्याबाबतही चर्चा झाली. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गतीने काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिल्या.
गावातील आदिवासी बांधव ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जात असल्याने मुलांचे जन्म वेगवेगळ्या गावात होतात त्यामुळे जन्म नोंदणी करण्यासाठी विलंब होतो. विलंबाने नोंदी घेण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांना अधिकार असल्यामुळे याबाबतची कारवाई होतानाही विलंब होतो. मुलांना शाळेत प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतात. याबाबत योग्य त्या उपाययोजना करा, अशा सूचना श्री गावडे यांनी दिल्या.
गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध करून देणे, रात्रीच्या वेळी गावामध्ये बिबट्यांचा वावर असण्याच्या शक्यतेने भीतीयुक्त वातावरण असते म्हणून गावास कुंपण करणे. आदिवासी बांधव वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. वेगवेगळ्या ठिकाणी नवीन मोबाईल क्रमांक घेतात व तो नंतर तो क्रमांक बंद होतो. आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेला मोबाईल क्रमांक बंद झाल्यामुळे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेत यामध्ये सुसुत्रता निर्माण करावी, असे निर्देश श्री गावडे यांनी यंत्रणेला दिले. बिरसा मुंडा योजना, ठक्कर बाप्पा योजना, जिल्हा वार्षिक योजनांसह आदिवासी बांधवासांठी असलेल्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत गतीने पोहचला पाहीजे, असेही ते म्हणाले.
आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आदिवासी जल जंगल जमिनीची काळजी घेतात जंगलांशी नाते घट्ट करण्यासाठी वनहक्क कायदा असल्याचे नमूद केले, आदिवासी विकास विभागा मार्फत बिरसा मुंडा योजनेतून स्मशानभूमी, वनपट्टयातील आदिवासी शेतकऱ्यांना विहिर व इतर कामांसाठी मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावे. यासाठी आश्रमशाळा, वसतीगृहांत मुलांना पाठविण्याचे आवाहन केले.
यावेळी नायब तहसिलदार दिलीप सोनावणे, मंडळ अधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी श्री दारकुंडे, वनहक्क शाखेचे अभिजीत पानठ, ग्रामसेवक श्री शेख, सरपंच सखाराम भुतांबरे यांच्यासह ग्रामस्थ् उपस्थित होते.
0000