आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत  पोहोचविणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

नागपूर,दि. 23 :   आरोग्य सुविधा सुलभपणे मिळण्यासाठी  निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. आरोग्य सेवेपासून कुणीही  वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते.  यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जैस्वाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितिन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, सहाय्यक संचालक प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत  यावेळी उपस्थित होते.

विभागातील  सर्व  रुग्णालयात फायर ऑडिट  पूर्ण करण्याच्या सूचना करताना  आरोग्य मंत्री म्हणाले की, यासंदर्भात  याबाबत 31 मार्च रोजी बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा,  असे निर्देश दिले.  रुग्णालयात स्वच्छता ठेवा व रुग्णांना योग्य आहार द्या, अशा सूचना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिल्या.

पीसीपीएनडीटी कायद्याबाबत कठोर पावले उचलण्यासाठी जिल्ह्यात समिती तयार करुन  दिवसेंदिवस होणाऱ्या भ्रणहत्येविषयी जागरुकता निर्माण करा. खाजगी दवाखान्यातील अहवाल नियमित सादर करण्यासाठी व त्यांना स्त्री-पुरुष प्रमाण यातील असमानता दूर करण्यासाठी मानसिकता बदलविण्याची गरज आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावर कठोर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी  सांगितले.

साहित्य खरेदी करतांना अनेकदा तफावत आढळते त्या तपासून घेऊन सी.ए. कडून अहवाल मागवा. साहित्य खरेदी नियमानूसार करा. आरोग्यावर शासन निधी उपलब्ध करुन देते. त्याचा सुयोग्य वापर करा, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. सादरीकरण सकारात्मक असले पाहिजे यावर भर द्या.  शासनाचा निधी सर्वसामान्यांच्या आरोग्यावर खर्च करण्यासाठी असतो. त्यानुंषगाने जनतेला सेवा द्या. शासनाचा निधी योग्य पध्दतीने खर्च व्हायला हवा, असेही ते म्हणाले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेप्रमाणे आयुष्मान भारत योजनेमध्ये गती आणावी. आयुष्मान भारत कार्ड वितरणात राज्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक आभा कार्ड वितरण करण्यात आल्याची माहिती वित्त राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी दिली. लिंग निदान करतांना रुग्णालयात सिसिटिव्ही असावा. त्यामुळे नोंद घेता येईल.  दिव्यांग व्यक्तींना जीवनात असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे जीवन सुकर कसे होईल याबाबत आरोग्य विभागाने प्रयत्न करावे, अशा सूचना वित्त राज्यमंत्री जैस्वाल यांनी दिल्या.

यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक शशिकांत शंभरकर यांनी  आरोग्य विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यात पीसीपीएनडीटी, आरोग्य विभागावरील खर्च होणारा इंधन खर्च, रुग्ण कल्याण समिती, फॉयर, स्ट्रक्चरल ऑडिट, प्रदुषण नियंत्रण, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, वाहने व त्यावरील खर्च आदीचा समावेश होता.

00000