मुंबई, दि. २४ : कोराडी येथील २×६६० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रकल्पात सुपर क्रिटीकल टेक्नॉलॉजीचा वापर करावा. जास्तीत जास्त क्षमतेच्या हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कोराडी विद्युत प्रकल्पासंदर्भात विधानभवनातील समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा. जास्तीत जास्त क्षमतेने हा प्रकल्प चालविताना कमीत कमी प्रदुषण होईल याकडे लक्ष द्यावे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच या प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज कमीत कमी दरात मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. गारेपालमा येथील कोळशाच्या वापरासाठी त्याच्या जवळच आणखी एक विद्युत प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. १४३३७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यात एफजीडी व एससीआर संयंत्र वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमिन उपलब्ध असून आणखी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
0000