मुंबई, दि. २४ : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन खरेदी करावी. लवकरात लवकर जमिन अधिग्रहण करुन सानुग्रह अनुदान देवून धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधानभवन येथे धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाच्या आढाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव पी. अन्बलगन, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.बी.राधाकृष्णन.टाटा पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेश नंदा उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानिर्मितीने ४७६.७६ हेक्टर खासगी जमिन थेट खरेदी पध्दतीने अधिग्रहित केली असून प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. जेवढी जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे तेवढीच जमिन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घ्यावी. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवून स्थानिक प्रशासनाने गतीने सानुग्रह अनुदान वितरीत करावे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १००० एकर जमिनीची आवश्यकता आहे. जर १३५० हेक्टर जमिन प्राप्त झाली तर ९०० एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा उरलेली जमिन एमआयडीसीला देण्यात यावी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सौर ऊर्जेसाठी पॅनल तसेच इतर यंत्रणा उभारावी. टाटा पॉवर कंपनीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे सौर ऊर्जा प्रकल्प लवकर पूर्ण करावा तसेच या परिसरात उद्योग उभारण्यासाठी, एमआयडीसाला जागा देण्यात यावी अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
००००
संध्या गरवारे/विसंअ/