अमरावती, दि. 24 (जिमाका): मेळघाटातील आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करण्यात आला. त्यानुसार आज दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यविषयक असलेल्या समस्या जाणून घेण्यात आल्या. येत्या काळात मेळघाटात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.
मेळघाटातील आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी श्री. आबीटकर यांनी दौरा केला. आमदार केवलराम काळे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसीलदार जीवन मोरनकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, सहायक संचालक भारती कुलवाल आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. आबीटकर यांनी मेळघाटात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. इतर ठिकाणी ज्या सुविधा नागरिकांना मिळतात तशाच सुविधा मेळघाटतही तयार करण्यावर भर देण्यात येईल. अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालय या भागातील महत्त्वाचे असल्यामुळे या ठिकाणी सुविधा वाढविण्यात येतील. आरोग्य यंत्रणेने सकारात्मक राहून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन केले.
दरम्यान मंत्री श्री. आबीटकर यांनी सकाळी हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. केंद्रातील आंतररुग्ण कक्षातील रुग्णांकडून माहिती घेऊन संवाद साधला. तसेच प्रयोगशाळा, औषध भांडार आदींची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. केंद्रातील पाणी आणि विजेची समस्या तातडीने निकाली काढण्यात येईल. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशा सूचना दिल्या. चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात श्री. आबीटकर यांनी औषधी विभाग, आंतररुग्ण कक्ष, प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया गृह, रक्तसाठा केंद्र, एक्स-रे केंद्राची पाहणी केली.
यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या आरोग्य यंत्रणांनी जाणून त्यानुसार सुधारणा करावी. रुग्णालयात प्रामुख्याने ग्रामीण आणि गरजू रुग्ण येत असल्याने त्याला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हिरडा येथील अंगणवाडी केंद्राला त्यांनी भेट दिली. याठिकाणी 47 बालके असून यातील एकही बालक कुपोषित नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच येत्या काळात चांगले कार्य करावे. बालकांचे पोषण होण्यासाठी त्यांना आणि मातांना सकस आहार पुरविण्यात यावा, असे निर्देश दिले. यावेळी लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.
बोरुगव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयाला श्री. आबीटकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने रस्ते आणि आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी मदत करण्यात येईल, असे सांगितले. दौऱ्यादरम्यान श्री. आबीटकर यांनी नागरिक, संस्था आणि संघटना त्यांच्याकडून निवेदने आणि तक्रारी स्वीकारल्या.
00000