मध्यरात्री राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे  धडक दौरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली.  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रात्री 12.30 ला रुग्णालयात अचानक भेट देऊन रुग्णालयातील वॉर्डमध्ये राऊंड घेऊन सखोल आढावा घेतला. अधिकाऱ्यांची  चौकशी करून आतापर्यंत झालेल्या एकूण शस्त्रक्रिया याविषयी माहिती घेतली. बाह्यरुग्ण विभाग तसेच आंतररुग्ण विभागामध्ये सद्यस्थितीत 321 भरती असलेल्या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. आतापर्यंत झालेले 51 यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत अधिकारी, डॉक्टर्स व त्यांच्या चमूचे  कौतुक केले.

तसेच किडनी प्रत्यारोपण ICU व NICU ला प्रत्यक्ष भेट दिली. त्याचप्रमाणे अपुऱ्या असलेल्या यंत्रसामुग्री विषयीची दखल घेतली. यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर  यांच्या समक्ष रुग्णालयातील टप्पा 3 बद्दल प्रस्ताव मांडण्यात आला. ज्यामध्ये लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट इत्यादी आजारांवर उपचार करण्यात येतील.  आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या   कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.

तसेच  तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे  आश्वासन दिले. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल ऑफिसर डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. माधव ढोपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, डॉ. अरुण सोळंके आदी उपस्थित होते.

00000