मुंबई, दि. 24 : राजस्थान राज्यातील मारवाडी समाज महाराष्ट्रात अतिशय मेहनतीने उभा राहिलेला आहे. हा समाज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोठे योगदान देत आहे. जन्मभूमी सोडून त्यांनी कर्मभूमीत केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बिर्ला मातोश्री सभागृह येथे राजस्थान ग्लोबल फोरमच्यावतीने सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार राज पुरोहित, संजय उपाध्यय, विजय दर्डा, अभिनेते आणि कवी शैलेश लोढा, राजस्थान ग्लोबल फोरमचे राकेश मेहता, मोतीलाल ओसवाल, दिलीप महेश्वरी आदि मान्यवर उपस्थित होते.
राजस्थान ग्लोबल फोरम हे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उत्तम कार्य करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या राजस्थानी समुदायाचा विकासात मोठा वाटा आहे. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर हे राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी असणारे तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठा संपर्क असणारे संवेदनशील व्यक्तीमत्त्व आहे. त्याच्यातील अद्वितीय आत्मविश्वास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर नागरी सत्कारास उतर देताना म्हणाले, तुम्हा सर्वांच्या मेहनतीमुळे जे काही साध्य झाले, ते मिळाले आहे. हाच खरा सन्मान आहे. माझ्या सार्वजनिक जीवनात जो माझा एकदा मित्र झाला, तो कायमचा मित्र राहिला आहे. कधीच कोणाशी संबंध तुटले नाहीत. सर्वांची मदत करता आली हाच माझ्यासाठी सर्वोत्तम सन्मान आहे. मला भाईसाहेब या नावाने ओळखले जाते याच्यासारखा आनंद कोठेही नाही, असे सांगून श्री.माथूर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
0000