मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम; चौकशी करून कारवाई होणार – मंत्री उदय सामंत

विधानसभा लक्षवेधी सूचना

विधानसभा लक्षवेधी सूचना

 

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;

चौकशी करून कारवाई होणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २५ : मुंबई शहर व उपनगरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, कोळीवाडा, वाशी नाका चेंबूर आणि धारावीच्या साईबाबानगर परिसरात अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे. म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची म्हाडाच्यावतीने कारवाई लवकरात लवकर होईल. विशेषतः राखीव भूखंड, सार्वजनिक जागा आणि खासगी मालमत्तांवर अतिक्रमण करून बांधकामे उभारल्याचे समोर आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात येणार असून, अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी कडक पावले उचलली जातील.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठी

वाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार– पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २५ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदुर बाजार, भातकुली, अमरावती तालुक्यामधील १०५ गावांच्या वाढीव पाणीपुरवठा  योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन  दरडोई ५५ लिटर्स पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य राजेश वानखेडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य नारायण कुचे यांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री पाटील म्हणाले, या वाढीव पाणीपुरवठा योजनेस २०२१ मध्ये तांत्रिक मंजुरी तर २०२२ मध्ये  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कामे संथ गतीने झाल्याने कंत्राटदारास दंड आकारण्यात आला आहे. या योजनेतून सध्या ८१ गावांना दरडोई ४० लिटर्स पाणीपुरवठा होत आहे.योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

गेवराई तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामे

वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २५ : बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत १७७ योजना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत गेवराई तालुक्यातील ४५ आणि माजलगाव तालुक्यातील २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रियेनंतर मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामे मंजूर करण्यात आली. कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे  मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी शासनामार्फत बीड जिल्हा परिषदेकरीता टाटा कन्स्लटन्सी सर्विसेस व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांकडील कामांकरिता नॅबकॉन्स या त्रयस्थ संस्थेचीतांत्रिक तपासणी करण्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या त्रयस्थ कंपनीद्वारे या योजनेच्या विहित टप्प्यांवरील कामांची तपासणी करण्यात येते व तपासणी अहवालामध्ये काही दोष, त्रुटी आढळून आल्यास त्यांची पुर्तता संबंधित कंत्राटदारामार्फत त्याच खर्चातून करण्यात येते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

बीड जिल्हा रुग्णालयातील कोविडकाळातील भ्रष्टाचार प्रकरणी

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार

– सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २५ : बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

याबाबत सदस्य नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही.या प्रकरणी सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी

मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी– राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. २५ : चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून ग्राहकांच्या खात्यातील तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम एका अज्ञात व्यक्तीने हरियाणाच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, बँकेत झालेली नोकरभरती व इतर गैरव्यवहारांचीही चौकशी होणार आहे. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि तपास जलद गतीने करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प नवी मुंबई, महापे येथे सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे सायबर पोलीस स्टेशनसह सहा विभाग कार्यरत असतील. प्रकल्प Go Live च्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच संपूर्णतः कार्यान्वित होणार आहे. हा प्रकल्प राज्यातील सायबर सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/