मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांवर नियंत्रणासाठी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमणार-  मंत्री उदय सामंत

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांवर नियंत्रणासाठी

आयएएस दर्जाचा अधिकारी नेमणारमंत्री उदय सामंत

मुंबई, दि, २५ : मुंबईमध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामावर नियंत्रण ठेवणे आणि दर्जा राखण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस दर्जाच्या) अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबाबत महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, नेमणूक करण्यात आलेला अधिकारी हा काँक्रिटीकरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासोबतच कामाचा दर्जा तपासणे, कामांमध्ये समन्वय ठेवणे, दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणे अशी जबाबदारी पार पाडणार आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि भविष्यात यामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत. मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा आणि त्यांना दर्जेदार रस्ते मिळावेत हा या निर्णयाचा हेतू असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामांविषयी नव्याने धोरण ठरवणार मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २५ : राज्यातील शहरांमध्ये होणारे अनधिकृत बांधकाम तसेच बांधकाम नोंदणीस उशीर झाल्यामुळे आकारण्यात येणारा शास्तीकर याबाबत नव्याने धोरण ठरवण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य शंशिकांत शिंदे, परिणय फुके, चंद्रकांत रघुवंशी, सदाभाऊ खोत यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याचे शासनाचे धोरण नसल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, या प्रकरणी सर्व बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल. तसेच शास्तीकर कमी करणे अथवा रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने करता येणार नाही. यासाठी हा कर रद्द करण्याबाबतच्या अर्थिक बाजू तपासून पहाव्या लागतील. तसेच सध्या ६०० चौरस फूट निवासी बांधकामांसाठी शास्तीकर लागू नाही. ही मर्यादा वाढवण्यासाठीही सर्व बाबी तपासून पहाव्या लागतील. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणताही दुजाभाव  न करता सरसकट कारवाई करावी या संबंधी सूचना केल्या जातील. तसेच अनधिकृत बांधकामांबाबत सर्व राज्यात एकच धोरण असावे अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

सागरी महामार्गाला चालना; ५२३ किमी रस्त्याचे चौपदरीकरण,

 ९ महत्त्वाचे पूल प्रस्तावित–  मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २५ : कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी या सागरी महामार्ग प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. ५२३ किमीच्या या महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची किंमत २६,४६३ कोटी रुपये आहेत. तसेच या मार्गावर ९ महत्वाचे पूल उभारण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य श्रीकांत भारतीय यांनी सहभाग घेतला.

सागरी महामार्गाचा प्रकल्प दोन टप्प्यात राबवला जाणार असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, या महामार्गावर रेवस, कारंजा, रेवदंडा, आगरदंडा, बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, काळबादेवी आणि कुणकेश्वर या ९ ठिकाणी पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी ५ पुलांच्या कामाच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. पूर्वीचा ५ ते ७.५ मीटरच्या सागरी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होते. त्याऐवजी आता हा रस्ता चौपदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातले २६, रत्नागिरी जिल्ह्यातले ३६ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ पर्यटनस्थळांना  जोडण्यासाठी जोडरस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे कोकणातील पर्यटनाला गती मिळून अर्थव्यवस्थेस मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

छत्रपती संभाजीनगर येथील नगर नाका ते केंब्रिज चौक रस्त्याबाबत

केंद्र सरकारकडे नव्याने प्रस्ताव   सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २५ : छत्रपती संभाजीनगर येथील नगर नाका ते केंब्रिज चौक रस्त्याचे नूतनीकरण करणे आणि याठिकाणी भुयारी मार्गाविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारकडे नव्याने प्रस्ताव पाठवण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य विक्रम काळे, संजय केनेकर यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने डी नोटिफिकेशन करून नगर नाका ते केंब्रिज चौक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभाल दुरुस्तीसाठी दिला असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, हा रस्ता हस्तांतरणापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या दुरुस्तीची ७३ कोटीची कामे केली आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने पूर्णतः राज्य शासनाकडे हस्तांतरीत केलेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व दुरुस्तीसाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तसेच शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे बाह्यवळण रस्ता निर्माण करण्यात आला आहे. तसेच पडेगाव ते सावंगी रस्त्याच्या डीपीआरच्या प्रक्रियेला गती देण्यात येईल. औद्योगिक क्षेत्राला जोडण्यासाठीही बाह्यवळण मार्गाचा विचार करण्यात येईल अशी माहिती मंत्री भोसले यांनी दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

वडपे ते ठाणे मार्गाचे काम प्रगतीपथावर; रुंदीकरणाचे ६७ टक्के काम पूर्ण–   मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २५ : वडपे ते ठाणे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून रुंदीकरणाचे काम ६७ टक्के तर खारेगाव खाडीपुलाचे काम ७१ टक्के पूर्ण झाल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, किशोर दराडे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

वडपे ते ठाणे हा रस्ता पुर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे होता असे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, आता हा मार्ग विकासक म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आला आहे. २३.८० किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. पूर्वी हा मार्ग ४ पदरी होता. आता याठिकाणी १२ पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये या महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक असल्यामुळे वाहतुक सुरळीत ठेऊन अंडरपास व पुलाची कामे करण्यात येत आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल. समृद्धी महामार्गाच्या आमनेपर्यंत एलिव्हेटेड रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. याचा डीपीआर करण्याचे काम सुरू असून या मार्गामुळे नागपूर,नाशिक येथून ठाण्याकडे येताना वेळेची मोठी बचत होणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकासकांना काम सुरू होण्यापूर्वीच

दिलेल्या ॲडव्हान्स निधीबाबत कारवाई करणार मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. २५ : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत खासगी विकासकांना भागिदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच ॲडव्हान्समध्ये ५० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याप्रकरणी संपूर्ण चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सचिन आहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, भाई जगताप, अनिल परब यांनी सहभाग घेतला.

म्हाडाच्या दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे सांगून मंत्री देसाई म्हणाले की, याबाबतचा अहवाल नुकताच शासनास प्राप्त झाला आहे. कोणत्या प्रकल्पाला कोणत्या मुद्द्यासाठी निधी दिला याविषयी अपर मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्यामार्फत छाननी केली जाईल.  अनियमितता झाली असल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात २० लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. आवास योजनेसाठी राज्यात ६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी परीक्षा कालावधी पुढे नेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २५ : शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठीच शालेय परीक्षांचा कालावधी पुढे नेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी म.वि.प, ९३ अन्वये उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.

इयत्ता १ ली ते ५ वी साठी २०० दिवस शाळा चालणे अपेक्षित आहे, तर इयत्ता ६ आणि त्यापुढील वर्गांसाठी २२० दिवस शाळा चालणे आवश्यक असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, परीक्षा आधी घेण्यात आल्यास विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर शाळेत येत नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा कालावधी अपुरा राहतो. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी परीक्षा सकाळी ८:०० ते १०:३० या वेळेत घेतली जाणार आहे. शिक्षक त्याच दिवशी संबंधित वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासू शकतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा निर्णय आहे. विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मंत्री भुसे यांनी सभागृहात सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध –  मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २५ : सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असून सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सफाई कामगार संघटनांसोबत बैठक घेण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सचिन अहिर यांनी म.वि.प. नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

लाड – पागे समितीमध्ये अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्ग, सफाई कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या कामगारांचा समावेश करण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, न्यायालयीन निर्देशांची तपासणी करून त्यानुसार आवश्यक ती सुधारणा केली जाईल. मुंबई महानगरपालिकेमध्येही यासंबंधीची स्थिती तपासून पुढील पावले उचलली जातील. २००० पूर्वी नियुक्त झालेल्या सफाई कामगारांना न्याय मिळावा यासाठी शासन पातळीवर पुनरावलोकन होईल. २००० नंतर नवीन नियुक्त्या न करण्याचा शासन निर्णय असल्याने, त्यासाठी वेगळे धोरण ठरवावे लागेल. यासंदर्भात सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/