मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून नियमित काटेकोर तपासणी केली जाते, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्याने हे काम सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यावर त्याची तपासणी केली जाते. काम दर्जेदार झाल्याचा अहवाल आल्यानंतरच या कामाचे देयक दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर सर्व प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या योजनांमधील कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही कामे विलंबाने सुरू होत असल्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊन भविष्यात या योजनेतील काम देताना कंत्राटदाराचा पूर्वइतिहास तपासला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात जितेश अंतापूरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य राजेश पवार, शेखर निकम, समीर कुणावार, बाबुराव कदम, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.
0000
एकनाथ पोवार/विसंअ/
रासायनिक प्रकल्पातील अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना– कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई, दि. २६ :- राज्यातील एमआयडीसीमध्ये होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी केमिकल प्रक्रियांवरील नियंत्रण, सुरक्षा आणि उपाय योजनांसाठी ‘एसओपी’ (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार केली जाईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी सांगितले, केमिकल कारखान्यांसाठी कडक नियम लागू करण्यात येतील. यासाठी उद्योग विभाग, कामगार विभाग आणि संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन केमिकल कारखान्यात घडणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षितता उपाययोजनांची तपासणी करण्यात येईल.
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील अल्काईलाईन कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या घटनेच्या अनुषंगाने तीन खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांनी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याबाबत कारवाई केली आहे.
कामगार सुरक्षा आणि कारखान्यांतील अग्निसुरक्षेबाबत नवीन औद्योगिक धोरणात आवश्यक तरतुदी करण्यात येतील, असे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी सांगितले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/