विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन ३० जून रोजी मुंबईत

मुंबई, दि. २६ : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ३० जून २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रत्यक्षात १४६ तास कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात १४६ तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ९ तास ७ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९१.८४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८३.५५ टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित ९ शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी ९ विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५ असून ५ सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या अधिवेशनात “जागतिक महिला दिन” आणि “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त” मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर चर्चा घेण्यात आली.

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज झाले असून रोजचे सरासरी कामकाज ७ तास १३ मिनिटे झाल्याची माहिती सभापती प्रा.शिंदे यांनी दिली. अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९१.६७ टक्के तर सरासरी उपस्थिती ८३.६५ टक्के होती.

विधान परिषदेत तीन शासकीय विधेयके पुर:स्थापित करण्यात येऊन तीन विधेयके संमत करण्यात आली. तर चार विधानसभा विधेयके पारित करण्यात आली. विधानसभेकडे एकूण पाच धन विधेयके शिफारशी शिवाय परत पाठविण्यात आली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात जास्तीत जास्त प्रश्नांना न्याय मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका सभापती प्रा. शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये पुकारण्यात आलेल्या आजवरच्या प्रश्नांच्या सरासरीपेक्षा जास्त संख्येने प्रश्न चर्चेला घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या अधिवेशनात ‘जागतिक महिला दिन’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त’ मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर चर्चा घेण्यात आली.

0000