छत्रपती संभाजीनगर,दि.२८(जिमाका)- गृह विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहाला गुरुवारी (दि.२७) भेट दिली. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ.जालिंदर सुपेकर, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक धनराज गवळे तसेच वरिष्ठ तुरुंगाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती रस्तोगी यांच्या हस्ते कारागृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नव्याने बांधकाम केलेल्या महिला कारागृहाच्या इमारतीची पाहणी श्रीमती रस्तोगी यांनी केली. महिला कैद्यांसाठी उपलब्ध असलेल्या ई-मुलाखत सुविधा, हेल्पलाइन, तसेच कल्याणकारी योजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाची पाहणी करून न्यायालयीन कामकाजाची माहिती घेतली. कारागृहातील सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता व्यवस्थापन, आणि बंदीवासीयांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेतला.
कारागृहातील गरीब व दुर्बल कैद्यांना न्याय मिळावा यासाठी “Support to Poor Prisoner Scheme” अंतर्गत आवश्यक मदत दिली जावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, कारागृहातील कैद्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या योजना राबवाव्या असे निर्देश त्यांनी दिले.