अमरावती, दि. 28 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी 700 च्या वर निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारीवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करण्यात येणार असून त्यासंबंधीची पोहोच पालकमंत्री कार्यालयातून येत्या आठ दिवसात देण्यात येणार आहे.
वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा या विषयावर सुमारे चार तास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सुमारे सातशेच्या वर तक्रारी पालकमंत्री यांनी स्वतः स्वीकारल्या. पालकमंत्री यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.