शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 28(जिमाका) : जनतेला सेवा देणारे पोलिस हे एक महत्वाचे विभाग आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांशी संवाद ठेऊन शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले

पोलिस आयुक्त कार्यालयात आज पोलिस विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रविण तायडे, प्रविण पोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, येत्या काळात सण उत्सवाचे वातावरण असणार आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहावे. प्रामुख्याने समाज माध्यमांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनीही व्हॉटसॲप ग्रुप तसेच काही संशयित नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. यासाठी सायबर कक्ष सक्षम ठेवावा. यातून समाज माध्यमांवरील हालचालींबाबत दक्ष रहावे. यातून अलर्ट राहता येईल. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करावा.

पोलिस दलाचे आधुनिकीकरण करताना पुढील दशकाचा विचार करावा. त्यानुसार पद किंवा पायाभूत सुविधांचा प्रस्ताव तयार करावा. येत्या काळात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुले गुन्हेगारी टोळ्यांच्या निशाण्यावर असल्याने मुलांमधील गुन्हेगारी बिंबवणारे व्हीडीओ किंवा कारवायांवर लक्ष ठेवण्यात यावे. पोलिसांना गुन्हे उकलसाठी मदत व्हावी, पोलिस मित्र किंवा शासनातर्फे नेमण्यात येणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकारी यांची मदत घ्यावी. त्यामुळे पोलिसांना समाजामध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकाराची माहिती गतीने मिळण्यास मदत होईल, असे सांगितले.

वैदर्भी मॉलचे उद्घाटन

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज वैदर्भी या बचतगट उत्पाद‍ित वस्तूंच्या मॉलचे उद्घाटन केले. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी कोनशिलेचे अनावरण केले. तसेच मॉलचे फित कापून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मॉलमधील बचतगटांनी उत्पाद‍ित केलेल्या खाद्यपदार्थांची पाहणी केली.