अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

परभणी, दि. ३१ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते थाटात पार पडले.

कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता येणार आहे, असे सांगितले.

परभणी विभागाअंतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगारांसाठी एकूण 70 बीएस-6 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारांसाठी प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. नवीन बीएस-6 मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे.

000