चंद्रपूर, दि. 1 : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हा तालुका राज्याच्या टोकावर असून हा भाग आदिवासीबहुल आहे. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणाऱ्या आदिवासींमुळेच संस्कृती जिवंत राहिली आहे. त्यांच्या लोककलेतून एका आदर्शवत संस्कृतीचे दर्शन आपल्याला होते, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
कोरपना येथे सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्याने आयोजित आदिवासी लोककला महोत्सवात अध्यक्ष म्हणून मंत्री डॉ. उईके बोलत होते. यावेळी मंचावर सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, सांस्कृतिक विभागाच्या प्रज्ञा पाटील, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी कला आणि संस्कृती ही गौरवप्राप्त आहे. अशा संस्कृतीचे दर्शन राज्यात व्हावे, यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आदिवासी माणसाने कायम संस्कृती जपली आहे. देव, समाज, धर्म आणि संस्कृतीचे पालन करणारा हा समाज आहे. त्यांच्यामुळेच ही संस्कृती निरंतर जिवंत राहणार आहे. राज्याचा आदिवासी विकास मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदिवासीबहुल या क्षेत्राकडे 100 टक्के लक्ष राहील. आमदारांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील, असे डॉ. अशोक उईके यांनी आश्वस्त केले.
आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेणार – ना.आशिष शेलार
आदिवासी लोककला महोत्सव एक पर्वणी आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन अतिशय चांगले केले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात आदिवासींचा आवाज बुलंद होईल, अशी त्यांची संस्कृती आहे. राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व तालुक्यात आनंदाचाचा आलेख वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत वर्ल्ड ऑडिओ – व्हिज्युएल समीट होत आहे. तेथे आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये सुध्दा आदिवासी संस्कृती आणि त्यांची कला रुजविण्यासाठी प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टकरी आणि प्रामाणिक आहे. आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे आहे. आदिवासींच्या विकासाच्या संकल्पाचा हा विषय आहे. सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये चंद्रपूर – गडचिरोलीतील आदिवासी खेळाडू झळकले पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार देवराव भोंगळे म्हणाले, कोरपना हा राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. माझ्या विधानसभा मतदार संघात कोरपना, जिवती आणि राजुरा हे तीन पेसा तालुके आहेत. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे तीन तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट शिखर सर करू शकले. कोरपना तालुक्यात आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी 15 कोटी, माणिकगड किल्ला आणि विष्णु मंदिराचे जतन करण्यासाठी 10 कोटी, गडचांदूर आणि कोरपना तालुक्याच्या विकासाठी प्रत्येकी 10 कोटी तसेच या दोन्ही तालुक्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार मुख्याधिकारी यमाजी धुमाळ यांनी मानले.
या समुहांनी सादर केल्या लोककला : जय लिंगो जय जंगो गोंडी लोकनृत्य मंडळ, जयसेवा गोंडी नृत्य मंडळ लोहारा, कोयावनसी लंका पती राजा रावण ढेमसा मंडळ चनई, जय रावण जय हिरासकू ढेमसा मंडळ देवूबाई गुडा, गोंडी ऑक्रेस्ट्रा, फॅन्सी ड्रेस, जय लिंगो जय जंगो हिरासकू ढेमसा मंडळ खैरगाव, जय लिंगो जय जंगो ढेमसा मंडळ भेंडवी, गोंडी ढेमसा मंडळ राजूरा, गोंडी ढेमसा नृत्य मंडळ खरारपेठ, घाटराई माथा घुसाडी मंडळ हातलोनी, आदिवासी मुलींचे वसतीगृह गडचांदूर, आदिवासी मुलींचे वसतीगृह कोरपना, जिल्हा परिषद प्राथ. शाळा चनई, जि.प. प्राथ. शाळा आसन, फाल्गुनी मसराम यांनी विविध आदिवासी लोककला सादर केल्या.