शासन बालकल्याण संकुल संस्थेच्या पाठिशी – पालकमंत्री, प्रकाश आबिटकर

बालकल्याण संकुलाला भेट, आवश्यक मदत करणार असल्याची ग्वाही

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : बालकल्याण संकुल ही संस्था शासनाचेच काम करत असल्याने तिच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिली. समाजात अनेक समस्याग्रस्त पीडितांना ऐनवेळी मदतीची गरज पडते, अशावेळी आवश्यक मदत घेण्यासाठीचा विश्वास बालकल्याण संकुलाबद्दल समाजात आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाला भेट देवून कामकाजाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, येथील मुलांची संख्या पाहता संस्थेबद्दल लोकांच्यात चांगला आत्मविश्वास आहे. असा विश्वास प्रत्येक संस्थेबद्दल निर्माण व्हावा. यावेळी त्यांनी दाखल मुला-मुलींशी संवाद साधून तेथील समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्याशीही कामकाजाबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिशुगृह, बालगृह तसेच कन्या बालगृहाला भेट दिली. जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष व्ही बी पाटील, मानद खजिनदार निरंजन वायचळ, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, संचालक व्यकंप्पा भोसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांचेसह इतर अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भेटी दरम्यान पालकमंत्री आबिटकर यांनी प्रत्येक विभागाला भेट देवून कामकाजाविषयक माहिती जाणून घेतली. उपस्थित 10 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांशी संवाद साधून त्यांनी मिळविलेल्या विविध प्राविण्याबद्दल माहिती जाणून घेतली.  अधिकारी पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संवाद साधत असताना संस्थेबद्दलची माहिती  कार्यवाह पद्मजा तिवले यांनी दिली. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा देत कामाची रूपरेषा सांगितली. यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी संस्थेमधील ज्या ज्या घटकासाठी मदत लागणार आहे त्यासाठी आवश्यक मदत करु असे सांगत येणाऱ्या अडचणीही सोडवू अशी ग्वाही दिली. सीपीआर रूग्णालयात संस्थेत दाखल होणाऱ्या मुलांचे आवश्यक मेडिकल करण्यासाठी खुप वेळ आणि त्रास सहन करावा लागु नये म्हणून विशेष गरज लक्षात घेवून एक खिडकी योजना किंवा समतुल्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी बैठक घेवून सूचना देवू असे सांगितले. तसेच राज्य शासनाकडून मिळत असलेले शिशुगृहासाठीचे अनुदान यावर्षीपासून मिळाले नाही. राज्यात सर्वांत चांगले शिशुगृह म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला आहे. तरी याबाबत अनुदान पुर्ववत सुरू करण्यासाठी मागणी उपस्थितांनी केली. यावर त्यांनी सचिवस्तरावर असणाऱ्या याबाबच्या तांत्रिक अडचणी दूर करून ते पुर्ववत होईल यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्वागत उपाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह पद्मजा तिवले यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना श्रीमती तिवले म्हणाल्या, राज्य शासनाने या संस्थेला तसेच कर्मचाऱ्यांना यावर्षीचा बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे. याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे ती दूर व्हावी. संस्थेतील शिुशुगृह हा महत्त्वाचा घटक असून यासाठी आवश्यक अनुदान राज्य शासनाकडून मिळावे. या संस्थेत प्रत्येक कर्मचारी जन्मलेल्या मुलांपासून ते तरूण मुला मुलींसाठी त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी मनोभावी योगदान देत आहेत असे सांगितले.