‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, टेंट सिंटी, पर्यटकांसाठी साहसी खेळ, विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा समावेश

मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत २ मे २०२५ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पावनगड या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ या पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा तलावात महोत्सव कालावधीत नेत्रदीपक लेझर शो होणार आहे. गुजरातमधील कच्छ रणच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक टेन्ट्स उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी अत्याधुनिक निवासव्यवस्थेकरिता टेंट सिंटी उभारली जाणार आहे. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद देखील आयोजित करण्यात येणार आहे.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वरच्या साबळे रोड येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. या महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. तसेच ४ मे २०२५ रोजी समारोप सोहळ्यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककला जसे की लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. तसेच, भव्य ‘ड्रोन शो’ या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या महोत्सवात सहभागी झालेल्या उद्योजक, ट्रॅव्हल गाईड्स आणि स्थानिक कलाकारांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करणार आहोत या महोत्सवाला पर्यटनप्रेमींनी जरूर यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/