विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही
बीड दि. 02 (जिमाका):- बीड जिल्हयातील विमानतळ, रेल्वे कामाची सद्यस्थिती, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, शिक्षण विभागाचे नवोपक्रम, इनक्यूबेशन सेंटर तसेच तारांगण, विद्युत वितरण, जिल्हयात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आज उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. बीड जिल्हयांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्व मिळून काम करू, विमानतळ, रेल्वे तसेच महत्वाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासोबतच विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सर्वश्री आमदार सतिष चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडीत, उपमुख्यमंत्री यांचे सचिव राजेश देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्हयांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व आपण सर्व नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाकडून जिल्हयातील विकासकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही देतानाचा त्यांनी सांगितले की, अनेक वर्षापासून रेल्वेमार्गाच्या सुरू असलेल्या कामाला गती देण्यात येईल. विभागीय आयुक्त बीड रेल्वेबाबत दर महिन्याला आढावा घेतील. रेल्वे मार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा प्रकरणी थेट सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचे गुन्हे नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
विमानतळासाठी आवश्यक जागा बीड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या कामखेडा नजीक निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे तसेच विमानतळ सेवा गतीने पूर्ण करण्यात येईल, विमातळाबाबतच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आष्टी येथील वीज उपकेंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत उपमुयमंत्री श्री. पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 2 कोटी घरकुल देण्याची योजना आहे, त्यात राज्यात 20 लाख घरकुल देण्यात येणार आहेत, बीड जिल्हयात सद्यस्थितीत 85 हजार घरकुलाचे काम सुरू आहे, येत्या कालावधीत 75 हजार घरकुले पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवून काम करूया. दिवाळी नव्या घरकुलात या उपक्रमाची सुरूवात श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आली. शासकीय निधीची वाट न पाहता घरकूल उभारणाऱ्या 10 कुटुंबाचा यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान गुणवत्ता विकास अभियान 2025 या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जाणार आहे. विद्याथ्यांमध्ये झालेल्या शैक्षणिक सुधारणांतून भावी पिढी चांगली तयार व्हावी, या हेतूने संपूर्ण जिल्हयात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक वर्गासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण मिळावे यासाठी 30 लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात गरज भासल्यास सीएसआर तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याचीही आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शालेय परिसर संरक्षक भिंत, शौचालय, अंगणवाडी तसेच शैक्षणिक विकासाला सर्वाच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही असल्याचे श्री. पवार म्हणाले.
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी यासाठी पोलीस प्रशासनासोबतच आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाला आवश्यक असलेला निधी तातडीने देण्यात येईल. पायाभूत सुविधा, वाहने तसेच पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक त्या बाबींची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी 16 कोटी 34 लाख रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचेही श्री.पवार म्हणाले. जिल्हयात यापूर्वी देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचीही पुन्हा पडताळणी करण्यात यावी. गरज तपासूनच शस्त्र परवाना देण्यात यावा,असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या वर्षात 50 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक निधी शासन स्तरावरून देण्यात येईल. बीडसह लगत असलेल्या परभणी, लातूर व धाराशिव या चार जिल्हयातील रुग्णांची संख्या पाहता सर्व सुविधाही देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
मराठवाड्यातील पहिले कौशल्यवर्धन केंद्र
शहराच्या मध्यवर्ती भागात आय. टी. आय. च्या तीन एकर परिसरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे. (Incubation center) टाटाच्या सहकार्याने हे केंद्र आकारास येईल. कंपनीतर्फ १६५.१० कोटी आणि एमआयडीसी कडून ३१.११ कोटी असे एकूण १९६.९८ कोटी खर्च करून याची उभारणी करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील हे पहिले कौशल्यवर्धन केंद्र ठरणार आहे. याआधी विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली व कोकणात रत्नागिरीत अशा केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कालबद्ध निधी विनियोग
यंदाच्या आर्थिक वर्षात नियोजनपूर्ण निधी विनियोग करण्याचे संकेत श्री. पवार यांनी दिले. लवकरच याबाबत बैठक घेऊन नियोजन निधीतील सर्व बाबी व यंत्रणा यांचा आढावा घेण्यात येणार असून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता गतिमान पध्दतीने प्रदान करत डिसेंबर २०२५ पूर्वी निधी खर्च होईल तसेच काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
आकर्षक असेल तारांगण
एक उत्तम आणि अद्ययावत तारांगण उभारण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्हाभरातील शाळकरी मुलांना सहलीच्या माध्यमातून माहिती मिळावी हा या उभारणीचा हेतू आहे. बीड शहरात येणाऱ्या प्रत्येकासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ देखील या तारांगणाच्या रूपाने उभे राहणार आहे. येथील आयटीआयच्या मोकळ्या जागेत २० कोटी रूपयांचा निधीतून तारांगण उभारण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृती आणि जिल्हयातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती ठेवण्याचे नियोजन आहे.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या विमानतळ, रेल्वे मार्गाची स्थिती तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत सादरीकरण केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक नववीन काँवत यांनीही आपल्या विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.