‘खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुला’स १० कोटींचा निधी वितरीत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 2 : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने ऑलिम्पिक पदक प्राप्त करून, जगात देशासह राज्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या नावाने कुस्ती संकुल उभारणे अत्यंत अभिमानास्पद असून, यासाठी 10 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तातडीने वास्तुविशारदांमार्फत आराखडा तयार करून बांधकाम सुरू करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात दिवंगत कुस्तीपट्टू खाशाबा दादासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी तालुका संकुल समितीचे सदस्य रणजित खशाबा जाधव, प्रियांका जाधव, भारती जाधव, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तहसिलदार कल्पना ढवळे, उपअधिक्षक भुमी अभिलेख प्रविण पवार उपस्थित होते.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कुस्ती संकुल उभारण्यासाठी नजिकच्या गावाची हद्द असलेली जमीन वर्ग करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तसेच संकुलासाठी निधी वितरीत करण्यात आला असून, तातडीने बांधकामास सुरुवात करावी. पुढील निधी टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येणार असून, या कामास गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/