भारतीय शल्यविशारदांना ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ पुरस्कार प्राप्त; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शल्यविशारदांचा सत्कार

मुंबई, दि. २ : सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES – Society of American Gastrointestinal & Endoscopic Surgeons) परिषदेचे १२ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत लॉन्ग बीच, लॉस एंजेलिस, अमेरिका येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ हा पुरस्कार भारताला मिळाला. हा पुरस्कार मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शल्यविशारदांचा सत्कार करुन कौतुक केले.

मंत्रालय येथील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सा संघटना असून, मिनीमल अक्सेस (Minimal Access) व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसंबंधीचे संघटनेकडून प्रस्थापित प्रोटोकॉल संपूर्ण जगभरात प्रमाण मानले जातात. ही संस्था दरवर्षी शैक्षणिक परिषदांचे आयोजन करते तसेच संशोधन व नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींना प्रोत्साहन देते. या सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) २०२५ परिषदेसाठी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालये, मुंबई येथील १३ शस्त्रक्रिया व्हिडिओ सादर करण्यात आले होते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (ग्रँट मेडिकल कॉलेज) जगातील या प्रमुख परिषदेतील सर्वाधिक व्हिडिओ सादरीकरण आणि स्वीकृती मिळवण्याचा मान मिळवला आहे, अशी माहिती पुरस्कार प्राप्त डॉ. गिरीश बक्षी यांनी यावेळी दिली.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन परिषदेत शल्यचिकित्साशास्त्र विभागातील अध्यापक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्य

प्रोफेसर डॉ. अजय भंडारवार –प्यूट्झ जेघर्स सिंड्रोम (Peutz-Jeghers Syndrome) मध्ये आंत्र संरक्षक शस्त्रक्रियेचा बॉवेल प्रिर्झविंग सर्जरी (Bowel Preserving Surgery) संकल्पना प्रथमच वैद्यकीय साहित्यात मांडली. ही नवी शस्त्रक्रिया तंत्रज्ञान भविष्यकालीन उपचार पद्धतींवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकेल. तसेच, आयएसजी (ICG) कांटिफिकेशन तंत्र विकसित केले, जे आंत्र जोडणीतील गळती ॲनास्टोमोटिक बॉवेल लेक (Anastomotic Bowel Leak) आणि गुंतागुंतीचे परिणाम अचूक ओळखण्यास मदत करेल. यामुळे रुग्णांचे मृत्यूदर व गुंतागुंत टाळता येईल आणि उपचाराचे परिणाम सुधारतील.

डॉ. गिरीश बक्षी – संशोधन प्रकल्पाची रूपरेषा तयार केली आणि डॉ. भंडारवार यांना शस्त्रक्रियेत मदत केली. तसेच, त्यांनी संशोधन विश्लेषण करून अंतिम अहवाल तयार केला.

डॉ. वरूण दत्तानी – वरील दोन विषयांवर संशोधन सादरीकरण केले आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ॲबस्ट्रॅक्ट हा पुरस्कार जिंकला. त्यांच्या सादरीकरणांनी मध्ये पहिले आणि तिसरे पारितोषिक मिळाले.

डॉ. मनीष हांडे – बॉडी पॅकर सिंड्रोम (Body Packer Syndrome) वरील संशोधन सादर केले, जिथे अतिशय कमी आक्रमक तंत्राचा वापर करून रुग्णाच्या शरीरातून ड्रग पेलेट काढण्यात आला. हा उपचार पहिल्यांदाच वैद्यकीय साहित्यात नोंदवला गेला असून, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

पुरस्कार श्रेणीतील सात पोडियम सादरीकरणात दोन सादरीकरणे सर ज.जी. रुग्णालयांमधील होती. ज्यामध्ये रुग्णसेवेसाठी नाविन्यपूर्ण आणि सुधारित शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.

या परिषदेत प्राप्त यशामागे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मोलाचे योगदान आहे. यासाठी पुरस्कार प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

0000

अर्चना देशमुख/विसंअ/