मुंबई, दि. ३ : विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.
वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाश्यांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना घरांचे करारपत्रे यावेळी वितरित करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत आहे. गणपती उत्सवाच्या आधीच रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
वांद्रे पूर्व येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ३०.१६ एकर जमीन उच्च न्यायालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वांद्रे पूर्व येथील ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या ७७ सदनिका व बालाजी शॉप किपर्स येथील ६७ सदनिका अशा एकूण १४४ सदनिका शासनाकडे पाठपुरावा करुन उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या सदनिका तयार होण्यास सहा ते नऊ महिन्याचा अवधी लागणार असल्याने १०० पात्र झोपडीधारकांने स्वखर्चाने पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची अट नमूद करुन पात्र झोपडीधारकांशी करारनामे करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
संजय ओरके/विसंअ/