समता पंधरवड्यानिमित्त ‘विशेष जात पडताळणी मोहीम’

माटुंगा येथे ९ एप्रिलला मार्गदर्शन कार्यशाळा

मुंबई, दि. ०३ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ९ एप्रिल २०२५ रोजी माटुंगा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई शहर समितीमार्फत १ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत सुलभ प्रक्रियेने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ११ ते ४ या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र, पडताळणी समिती, मुंबई शहर, पंचशील एम १ तळमजला, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मिकी रोड, माटुंगा मुंबई – १९, या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी, शासकीय सेवेतील अर्जदार यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करिता, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून याबाबत चर्चासत्र ही आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये समितीकडील प्राप्त प्रकरणांतील त्रुटीयुक्त प्रकरणात अर्जदार यांना मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येणार आहे. संबंधित अर्जदारांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/