भारत आणि चिली यांच्यातील सांस्कृतिक मैत्री वृद्धिंगत होणार – चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट

मुंबई, दि. ३ : कला आणि संस्कृती केवळ मनोरंजनासाठी नसून ती राजनीतिक आणि सामाजिक एकजुटीचे साधन आहे. भारत आणि चिली देशांमध्ये भौगोलिकदृष्ट्या अंतर खूप असले तरी मानवता, कला आणि संस्कृती हे घटक जोडणारे आहेत. दोन्ही देशांदरम्यान चित्रपट सहनिर्मिती करार करण्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल होत आहे. यामुळे भारत आणि चिली यांच्यातील सांस्कृतिक मैत्री अधिक वृद्धिंगत होईल, असे मत चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांनी व्यक्त केले.

हॉटेल ताज येथे हॉलो इंडिया, नमस्ते चिली, शूटिंग इन चिली या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चिलीच्या सांस्कृतिक व कला विभागाचे मंत्री कॅरोलिना अरेडोंडो, चिलीच्या असोसिएशन ऑफ प्रोड्युसर ऑफ सिनेमा अँड टेलिव्हिजनच्या उपाध्यक्षा आलेजांद्रा, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच भारतीय चित्रपट क्षेत्रातील निर्माते, अभिनेते उपस्थित होते.

चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरेक फाँट म्हणाले, भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. दरवर्षी १५०० हून अधिक चित्रपट २० हून अधिक भाषांमध्ये तयार होतात. त्यामुळे चिली आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी साधन ठरू शकते. एखादा बॉलिवूड चित्रपट चिलीच्या अँडीज पर्वतरांगांमध्ये, पटागोनियामध्ये किंवा व्हॅली डेल हुआस्कोमध्ये चित्रित झाला, तर त्यामुळे  आमच्या देशाला जागतिक स्तरावर आणखी ओळख मिळेल. व्यापार आणि संस्कृती एकमेकांना पूरक आहेत. भारत आणि चिली यांच्यातील संबंध केवळ आर्थिक लाभासाठी नाहीत, तर लोकांमधील जवळीक निर्माण करण्यासाठी आहेत. व्यापाराबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवायची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार म्हणाले, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संवाद जागतिक स्तरावर मदत करतो. भारत आणि चिलीमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यांवर आधारित आहेत.

भारताप्रमाणेच, चिलीमध्येही प्रवाशांसाठी वैविध्यपूर्ण अनुभव उपलब्ध आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी चिलीला शूटिंग लोकेशन म्हणून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सह-निर्मिती हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. चिली भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देऊ शकतो.

यावेळी चित्रपट निर्माते विवेक सिंघानिया यांनी मनोगत व्यक्त केले.

0000

गजानन पाटील/ससं/