मुंबई, दि. ४: मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
००००