मुंबई, दि. ४ : अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमतांचा विकास करण्याच्या उद्देशाने “मिशन लक्ष्यवेध” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असून, इच्छुक क्रीडा अकादमींनी २१ एप्रिल पर्यंत अर्ज करावेत अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. खेळाडूंनी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी वॉक्सिग, अथलेटीक्स, कुस्ती, टेबल टेनिस, व शूटिंग हे खेळ आहेत.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडामार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग तसेच ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक रु.१०.०० लक्ष, ‘ब’ वर्ग रु.२०.०० लक्ष व ‘अ’ वर्ग रु.३०.०० लक्ष आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ बाबींवर खर्च करण्यासाठी शासना मार्फत देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजी नगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१ या पत्त्यावर संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर यांनी केलेले आहे. तरी अधिक माहितीसाठी श्रीमती प्रिती टेमघरे (क्रीडा कार्यकारी अधिकारी) मो. क्र. ९०२९२५०२६८ यांच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/