बीड, दि. 4 (जि. मा. का.):- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. या प्रकरणात सहभाग सिद्ध झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.
श्री.कदम यांनी आज मस्साजोग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कै.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कै. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली. सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटूंबियांच्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
देशमुख कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर श्री. कदम यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली.
बीड तरुंगात कैदेत असणारा या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अतिविशिष्ट दर्जा (VVIP) प्रमाणे वागणूक तुरूंगातील अधिकारी देत आहेत असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असून कराड आणि त्याच्या सहकारी अरोपींना इतर कारागृहात हलविण्याबाबत कार्यवाही संदर्भात बोलेन असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मी आलो आहे. या अतिशय निर्घुण हत्याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही व आरोपीला फाशीच होईल या पद्धतीने आपण या प्रकरणाकडे पाहत आहोत, असेही श्री.कदम यावेळी म्हणाले.