रायगड (जिमाका) दि. 4 :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या स्मृतिदिन कार्यक्रमास दि.12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज महाड येथे आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश दिवेकर, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाहक सुधीर थोरात, महाड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य आणि विविध विभागाचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी प्रशासन, पोलीस, पुरातत्व विभाग तसेच स्थानिक समित्या यांनी परस्पर समन्वयाने कार्यक्रमाचे दिमाखदार नियोजन करावे असे निर्देश दिले. एप्रिल महिन्यात असलेल्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पुरेश्या प्रमाणात पिण्याचे पाणी, औषधे साठा ठेवावा. रायगड वर येणाऱ्या महिला व पुरुष यांच्यासाठी पुरेश्या प्रमाणात स्वछता गृह उपलब्ध करून द्यावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.