प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष असून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावीत, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे. प्रभू श्रीराम यांनी जी मूल्ये सांगितलेली आहेत, त्या मूल्यांची जोपासना करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मानखुर्द येथील संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर, दैनिक तरुण भारतचे संपादक किरण शेलार, संजोग सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ बन यांच्यासह सोसायटीमधील रहिवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीरामांचे एकूण जीवन बघितले तर आपण त्यांना युगपुरुष म्हणतो. एक युग प्रवर्तित करण्याचे काम त्यांनी केले आहे. प्रभू श्रीराम यांच्यामध्ये देवाचा अंश आपण मानतो. मग ते देव होते, तर कदाचित रावणाशी चमत्कारानेदेखील लढू शकले असते. पण त्यांनी तसे न करता समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजयी वृत्ती तयार केली. जेणेकरून त्यांचा अभिमान, आत्माभिमान जागृत झाला  त्यामुळे आसुरी शक्तीला पराभूत करू शकले. सामान्य माणूसदेखील ज्यावेळेस सत्याच्या मार्गाने चालतो, त्यावेळी असत्य कितीही मोठे व आसुरी असले, तरी त्या आसुरी शक्तीचा नि:पात तो करू शकतो. त्यामुळे प्रभू श्रीराम यांनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करावा, असे सांगून संजोग सोसायटीच्या रहिवाशांना मुख्यमंत्री यांनी  शुभेच्छा दिल्या.