शासकीय शाळांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार – कु. आदिती तटकरे

अलिबाग (जिमाका) दि.५: बीपीसीएलच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील ९ शाळांमध्ये ११० संगणक ६० डिजिटल स्मार्ट बोर्ड्स लावण्यात आले आहेत.
ही केवळ सुरुवात असून, भविष्यात आणखी उपक्रम राबवून शासकीय शाळांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे,असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालय रोहा, येथे केले.
यावेळी कु.तटकरे यांनी सांगितले की, “ही संकल्पना खासदार  सुनील तटकरे यांची असून, आम्ही सदैव शैक्षणिक क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. जे पूर्वीच्या पिढीला मिळालं नाही, ते आजच्या पिढीला द्यावं, ही आमची मानसिकता आहे. आजच्या काळात खासगी शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण हे मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळांमधूनही मिळायला हवं, यासाठी हे पाऊल उचललं आहे. अशा उपक्रमांमुळे पालक व विद्यार्थी वर्ग यांचा विश्वास अधिक वाढेल.”
खासदार तटकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर काम करत असताना, केवळ पेट्रोलियम क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापन किंवा रोजगार निर्मिती नव्हे, तर कंपन्यांच्या समाजिक दायित्व निधी (CSR) चा वापर शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठी कसा करता येईल, यावरही त्यांचा विशेष भर आहे.
या उपक्रमांतर्गत, जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून केवळ डिजिटल बोर्ड्सच नव्हे, तर सर्व शाळांमध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स सुद्धा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे  नगरपरिषदेच्या ‘क वर्ग’ मधील शाळा एकाच वेळी डिजिटल शिक्षण प्रणालीसह सुसज्ज करणारी पहिली रोहा नगरपरिषद ठरली आहे.
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी रोहा-अष्टमी नगरपरिषद,अजयकुमार एडके, शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,
रोहा अष्टमी नगरपरिषदचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.