ग्राम कृषिविकास समितीने प्रकल्पासाठी सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. 5 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी गावपातळीवर ग्राम कृषिविकास समितीने सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज सिन्नर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कार्यशाळा व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले] तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड, पाणी फाउंडेशनचे राजेश हिवरे यांच्यासह अधिकारी व पोकरा योजनेतील समाविष्ट असलेले गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी जागतिक बँकेने निकषांनुसार विकासावर आधारीत गावांची निवड केली असून या सूवर्णसंधीचा गावांनी फायदा करून घेतला पाहिजे. ग्रामस्थांनी त्यांची शेती चांगल्या प्रकारे कशी विकसित कशी होईल यासाठी एकत्र येवून लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी करावयाचा आहे. हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करून  संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे,  पाण्याचा कार्यक्षमतेने वापर  वाढविण्यासाठी उपायोजना करणे व कृषी मालाची मूल्यसाखळी वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे. शेतकरी सक्षमीकरणासह येणाऱ्या काळात शेतमालाची विक्री व्यवस्था सुद्धा मजबूत करण्यासाठी शासन प्रयन्तशील असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेले काम उल्लेखनीय असून लोकसहभागतून या प्रकल्पास निश्चितच गती मिळणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याठी डिजीटल फ्लेक्स व होर्डींगच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी  करण्यात यावी, अशा सूचनाही कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी कृषी अधिकारी श्री नाठे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत झालेले कामांचा आढावा यावेळी सादर केला. पाणी फाउंडेशन चे श्री. हिवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. आमले व तालुका यांनीही मनोगत व्यक्त केले.

सिन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी घेतला आढावा

सिन्नर तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांचा कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. बनसोडे, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सिन्नर चे कार्यकारी अभियंता गंगाधर नवडंगे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) मुकेश धकाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे  कार्यकारी अभियंता सचिन गोमासे, उप अभियंता अंकित जाधव उपस्थित होते.

उपअभियंता श्री. जाधव यांनी एकूण 80 पाणी पुरवठा  योजनांपैकी पूर्ण झालेल्या योजना, प्रगतीत असलेल्या योजना, सुरू असलेल्या व बंद असलेल्या योजनांचा आढावा सादर केला. कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित असलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून त्यांना पाणी पुरवठा योजनांबाबत असलेल्या अडचणी  जाणून घेतल्या व त्या सोडविण्याठी आवश्यक  कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.