पुणे दि.५: समाजाचं समाजाला परत देण्याची भावना नेहमी अंगीकारणारे नामवंत ज्येष्ठ वकील एस. के. जैन यांचे कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
ज्येष्ठ वकील अॅड. एस. के. जैन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, नगर विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्राचे महा अधिवक्ता बिरेंद्र सराफ, सौ. पुष्पा जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, एस. के. जैन यांनी वकिली क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविला आहे. वकिली करीत असताना त्यांनी अनेक वकील घडविले. आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या देऊन मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. वकिलीसोबतच त्यांनी अनेक क्षेत्रात काम करत असताना विश्वस्ताची भावना कधीही सोडली नाही, आपण मालक नसून विश्वस्ताची जबाबदारी पार पाडत आहोत असे मानून, आपल्याला जी जबाबदारी दिली ती लोकाभिमुख कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काम केले. श्री जैन यांचा संपर्क व्यापक असून त्यांनी गरजूंना नेहमी मदतीची केली आहे.
याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अॅड.एस के जैन यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस के जैन यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
श्री. जैन मनोगतात म्हणाले, हा सत्कार माझा नसून सर्व समाजसेवकांचा सत्कार आहे. समाजाने मला खूप दिलं आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही. त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जैन यांच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विधीज्ञ, समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.