मुंबई, दि. ७ : आग्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणे’, पानिपत येथील ‘काला अंब’ येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारणे यासाठी पर्यटन, सांस्कृतिक व पुरातत्व विभागाने लवकरात लवकर स्मारक उभारण्यात येणाऱ्या ठिकांणाची पाहणी करावी असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली या कामांचे संपूर्ण समन्वयन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतिले. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “ज्या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी नजरकैदेत ठेवले होते, त्या वास्तूचे ठिकाण सर्व तज्ज्ञ लोकांकडून माहिती करून घेवून विहित परवानग्या घेवून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त “काला अंब” परिसरात आयोजित मराठा शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. त्यांनी या ऐतिहासिक स्थळी मराठा योध्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांच्या उभारणीसाठी शासन राज्यस्तरीय समितीचे गठन करून जमीन अधिग्रहण, या कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणे ही काम प्राधान्याने करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.
मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशभर होवून, नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल – मंत्री जयकुमार रावल
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आग्रा येथे आग्रा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारल्यामुळे या वास्तूस नवसंजीवनी मिळणार असून, महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण कायमस्वरूपी राहील. महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी स्थळ ठरेल. तसेच पानिपतमधील “काला अंब” येथे भव्य स्मारक उभारले जाणार आहे हे स्मारक देखील राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव आणि शौर्याचे प्रतीक ठरेल, मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशभर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
०००
संध्या गरवारे/विसंअ/