जळगाव, दि. ८: जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या वसतीगृहांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले.
ते नियोजन भवन, जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजू लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील तसेच इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री आठवले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, आवास योजना आणि इतर सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला.
ते म्हणाले की, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडूनही अडीच लाख रुपये देण्यात येतात. यासाठी जिल्ह्यातून अधिकाधिक अर्ज येण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
यावेळी ऍट्रॉसिटी प्रकरणांची माहिती घेऊन, समाजात जनजागृतीसाठी लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची माहिती सादर केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ऍट्रॉसिटी प्रकरणांची सद्यस्थिती सांगितली. सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी विभागाचे सादरीकरण करत सविस्तर माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
—