18व्या आणि 19व्या शतकात इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अन्य पाश्चिमात्य राष्ट्र आणि भारतामध्ये ज्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळी किंवा परिवर्तन झालीत, त्यात वृत्तपत्राचे योगदान मोलाचे आहे. जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक घडामोडी समाजापर्यंत येणारे वृत्तपत्र हे एक प्रमुख साधन होते आणि आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “संपादकांनी घेतलेली स्वयंदीक्षा म्हणजे पत्रकारिता होय” असे म्हटले आहे. वृत्तपत्रे किंवा पत्रकारिता म्हणजे वर्तमानाची व्याख्या करणारी आणि भविष्य घडविणारी एक घटना आहे.
वृत्तपत्रामुळे समाजातील निर्भयता, स्पष्टपणा आणि स्वातंत्र्याचा उदय होतो. मानवी समाज वृत्तपत्रातील घटना, लेख-अग्रलेख वाचून प्रभावित होतो. अर्थातच त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्याप्रमाणे संपादकाला स्वयंदीक्षा घ्यावी लागते. कारण संपादकाच्या बौद्धिक, सामाजिक, जागृती आणि जाणीवेवरच हे सगळं अवलंबून असते. वृत्तपत्रांच्या कार्यानुसार आणि पत्रकाराच्या ध्येयानुसार पत्रकारितेला विविध भागात विभागीत करण्यात आले आहे. त्यात ‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ म्हणजे जनसमर्थन पत्रकारिता ही महत्त्वाची पत्रकारिता आहे.
‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ मध्ये पत्रकार एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेतात आणि त्यांच्या लिखाणाने वाचक किंवा प्रेक्षकांना त्यांचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करतात. सामाजिक प्रश्न वा समस्या सोडवणुकीसाठी न्याय मिळवून देईपर्यंत सातत्यपूर्ण केलेली पत्रकारिता म्हणजे ‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ जनसमर्थन पत्रकारिता होय. या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करता, भारताला राष्ट्र म्हणून उभे राहायचं असेल, जगायचे असेल, तर सर्वप्रथम भारतातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून द्यावी लागेल. हा ऐतिहासिक महामंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेने जगाला दिलेला आहे. माणूसपणाच्या भोवती असलेली विषबंदी, तिचा त्याग करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयांनी करून राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्राच्या ऐक्याचा संकल्प करावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच पत्रकारितेचे उद्दिष्ट होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन स्वीकारून तत्कालीन स्पृश्य-अस्पृश्य समाज, राजकीय नेते, त्यांचे राजकीय विचार प्रवाह आणि ब्रिटिश सरकार यांच्या परस्पर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, द्वन्दाची अधिक सटीक पद्धतीने मांडणी करून समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वलिखित अग्रलेखातील विविध पैलू हे समकालीन इतर पत्रकारांच्या पेक्षा भिन्न आहेत. त्यांची दृष्टी, विषय मांडणी, दूरदृष्टीची परिणामकारकता भेदक आणि मार्मिक आहे. त्यांचे लेखन बहुआयामी बहुविषयी स्पर्शित आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनसमर्थन पत्रकारितेने माणूस घडविण्याच्या आणि एक नवीन भारत निर्मितीच्या महान क्रांतिकारी कार्यात अमूल्य योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करता 1920 ला त्यांनी ‘मूकनायक’ द्वारे मुक्यांना बोलके केले, तर ‘बहिष्कृत भारत’ ने बहिष्कृत समाजाला प्रबोधित करून अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी तयार केले. याच बहिष्कृत भारतातील जनतेला त्यांच्या ‘जनता’ ने अधिकारांची आणि न्याय हक्काची जाणीव करून दिली. या देशातील मुक असलेल्या माणसाची प्रगती अशा पद्धतीने करत, माणसाला प्रबुद्ध नागरिक आणि देशाला प्रबुद्ध भारत बनविण्याचे महान कार्य ‘प्रबुद्ध भारता’तून त्यांनी केले आहे. त्यामुळेच एक नवा इतिहास घडला. असे कार्य त्यांच्या जनसमर्थन पत्रकारितेमुळे घडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे उद्दिष्ट समाज परिवर्तन, समाज सुधारणा करणे, हे असल्यामुळे त्यांनी लोकप्रबोधन आणि लोक शिक्षण, सामाजिक जाणिवेच्या अनुषंगाने आपल्या अग्रलेखांचे लेखन केले आहे. त्या विषयाच्या मांडणीमध्ये त्यांचे सामाजिक परिवर्तन हेच ध्येय आहे. एकूण समग्र परिवर्तन आणि मानवी कल्याणाचे ध्येय हस्तगत करण्यासाठीच त्यांनी अग्रलेखाचे लेखन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी महान राज्यघटना देऊन, एक स्वयंपूर्ण लोकशाही लोकराज्य म्हणून निर्माण केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते जनसंपर्क पत्रकारितेचे जनक ठरतात.
प्रा. संजय घरडे
9130377511
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती
000000