परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटीबध्द – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

सेलू येथील सेवा संकल्प शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 तीन दिवसीय शिबीराचे थाटात उदघाटन

 विविध स्टॉलच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रसिध्दी

महिला बचतगटाचे स्टॉल ठरले विशेष आकर्षण

१० एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर

परभणी, दि. (जिमाका) : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य चांगले ठेवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि तरुणांना रोजगार व संधीच्या दृष्टीने सक्षम करण्यासह परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी  प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. तर केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रगती करावी, असे आवाहन  गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले.

सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आज सेवा संकल्प शिबीराचे थाटात उद्घाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेनिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी राहूल गिते, क्रेडिट सोसायटीच्या मार्गदर्शक संगीता चव्हाण, सेलूच्या उपविभागीय अधिकारी अधिकारी संगीता सानप उपस्थित होत्या.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत सेवा संकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या उदघाटनप्रसंगी बचतगटांच्या महिलांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी असून त्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांनी दिली जात आहे. तसेच बचतगटाचे स्टॉलही येथे आहेत. सर्वच स्टॉलवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

आयोजित कार्यक्रमप्रसंगी  श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 एप्रिलपर्यंत आयोजित या शिबीराचा लाभ परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी अवश्य घ्यावा. तसेच 10 एप्रिल रोजी सर्वांसाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून जनतेने आरोग्य तपासण्या अवश्य करुन घ्याव्यात.

परभणी जिल्ह्याच्या प्रगतीबाबत बोलताना श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटीबध्द असून आजच सेलू येथे डायलेसीस केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. पूर्णा येथे लवकरच डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात येणार असून अठरा महिन्यात इमारतीचे काम पूर्ण केले जाईल. परभणी येथील सरकारी रुग्णालयात स्तन कॅन्सरवरील केमोचे उपचार सुरु करण्यात आले आहे. भविष्यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट केल्या जातील. पाच किलोमीटरच्या आत नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून विभागप्रमुखांना एक गाव दत्तक देण्यात आले आहे. या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहाचविल्या जात आहेत. महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडीट सोसायटी यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे चार लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी गुंतवणुकीवरही भर दिला जाईल. प्रगतीसाठी महिला, तरुण, नागरिकांनी सेवा संकल्प शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा, असे शेवटी त्यांनी आवाहन केले.

श्री. भोयर यांनी आपल्या भाषणात सेवा संकल्प शिबीराचे कौतुक केले. ते म्हणाले की, या शिबीराच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. या शिबीराचा सर्वांनीच लाभ घ्यावा. विशेषत: महिलांनी विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:ला आर्थिक दृष्टया सक्षम बनवावे. क्रेडिट सोसायटीच्या माध्यामातून महिलांनी उदयोग सुरु करावेत.  सेवा सहकारी संस्था या ग्रामीण भागासाठी वरदान ठरल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करावी, असेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी संगीता चव्हाण यांनी महिला क्रेडिट सोसायटीचे महत्व विषद केले. त्या म्हणाल्या की, नागपूर येथे सुरुवातीला बचतगट सुरु केल्यानंतर आम्ही काही महिला एकत्र येऊन नागपूर महिला सन्मान क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी सुरु केली. या माध्यमातून महिला आर्थिक दृष्टया सक्षम होण्यास मदत झाली आहे. आता महिलांनी  स्वत:हून क्रेटिड सोसायटी स्थापन करुन महिलांची बँक सुरु करावी. आत्मविश्वासाने उद्योगही सुरु करावेत. केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेचा लाभ महिलांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. त्यांनी सेवा संकल्प शिबीराबाबत सविस्तर माहिती दिली. आभार उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी मानले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी विविध विभागांचे स्टॉल व बचतगटांच्या स्टॉलला भेट दिली.

*-*-*-*-*