मुंबई, दि. ९: भगवान महावीरांच्या पवित्र संदेशांचा आपल्या जीवनात अंगीकार करतानाच त्यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांची शिकवण आजही जीवन शांत, संयमी आणि यशस्वी करण्याचा मार्ग दाखवते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, भगवान महावीरांनी सत्य, अहिंसेबरबरच क्षमा करण्यावर सर्वाधिक भर दिला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नैतिकता आणि सद्गुण ही त्यांची शिकवण होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी समर्पित केले.
महावीर जयंती दिनी त्यांच्या शिकवणींचे स्मरण करून त्या आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दिवस आहे. केवळ शारीरिक हिंसेपासून नव्हे, तर मनाने आणि वाणीनेही कोणालाही दुखवू नये, हा भगवान महावीर यांनी दिलेला संदेश खुप मोलाचा आहे. समाजात शांती, समता आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी आपण सर्व जण मिळून प्रयत्न करूयात, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.
००००