अमरावती , दि. १० (जिमाका) : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषीक्षेत्रात आमुलाग्र सुधारणा केली. तसेच विदर्भातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहाेचविली. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ बहाल व्हावे, यासाठी पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्रवीण पोटे – पाटील, सचिव प्राचार्य डॉ. वि. ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य अत्यंत मौलिक आहे. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपाने त्यांनी जनसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडी खुली केलीत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेत आज केजी टू पीजी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. येथील विदयार्थी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत. भारत हा युवकांचा देश आहे. तरुण युवा मानव संसाधनाची गरज संपूर्ण जगाला आहे. येत्या काळात जगातील ६० टक्के तरुण युवा मानव संसाधनाची गरज भारत पूर्ण करू शकेल, अशी ताकद येथील युवकांमध्ये निर्माण व्हायला हवी. युवकांनी भविष्यातील संधी ओळखून शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मान्यवरांच्या हस्ते देवलाल आठवले लिखित ‘भारतीय संविधानः डॉ. पंजाबराव देशमुख’ पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष गायकवाड यांनी तर आभार गजानन फुंडकर यांनी मानले.
अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी प्रवीण पोटे पाटील यांच्याकडून १० डायलीसिस मशीन
पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी त्यांचे आई- वडील स्व. सूर्यकांतादेवी व स्व. रामचंद्रजी पोटे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहा डायलीसिस मशीन दिल्या आहेत.
या दहा डायलीसिस मशीनपैकी आठ मशीन डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे आजपासून रुग्णांच्या सेवेत सुरु करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले.
अमरावती जिल्ह्यात मूत्रपिंड विकाराचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, डायलिसिस सेवेची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या सेवेमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्ये या सेवेसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे.