अमरावती, दि. 10 : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा सुकर पद्धतीने देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गावागावात शिबीरे, ऑनलाईन सुविधा, अधिकाऱ्यांच्या गाव भेटीने प्रश्न जलदगतीने सुटतील. शासनाच्या अशा विविध प्रयत्नातून जनतेचे जीवनमान सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
अमरावती उपविभागीय कार्यालयात महसुली वाचनालयाचे उद्घाटन, फ्री होल्ड जमिनीचे प्रमाणपत्र वितरण, शेत वहिवाटीच्या रस्त्यांचे नकाशे वितरण आणि योजनेचा लाभ स्वत:हून सोडलेल्यांचा आज सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार रवि राणा, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, चंदू यावलकर, प्रवीण पोटे-पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, शासनाने कामकाजात गतिमानतेचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार अनेक बदल घडवून येत आहे. यात प्रामुख्याने अमरावतीचे विमानतळ येत्या 16 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासोबतच प्रकल्पग्रस्तांना 800 कोटी रूपयांचे वाटप, 800 दिव्यांगांना मदतीचे वाटप होणार आहे. स्वामित्व योजना राबवून प्रत्येकाला जमिनीची मालकी देण्यात येत आहे. तसेच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, झुडपी जंगल सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे जमिनी उपलब्ध होणार असून प्रत्येकाला पट्टे देणे शक्य होईल. जीवंत सातबारा मोहिमेतून सातबारावरील मृत व्यक्तींची नावे काढून वारसांची नावे शासन स्वत: नोंदविणार आहे.
नागरिकांना शासकीय सोयीसुविधा विनासायास मिळाव्यात यासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येत आहे. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने समस्या जाणून घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणाहून नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानातून विहित मुदतीत दाखले देण्याचे काम करण्यात येईल. पांदण रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. येत्या काळात सर्व पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त होतील. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे. तसेच पाणी आणि वीज उपलब्ध करून शेतकऱ्यांची पिढी सशक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वसंत सोनार, रूपाली सोनोने, ममता कबीरे, वर्षा भुयार, सुनिता गोमकाळे, बबलू गावंडे, रामभाऊ भोंडे, लक्ष्मीकांत लढ्ढा, सुनिलकुमार बुधवानी, अमितकुमार राठी, प्रिया देशमुख, जु. ये. मानकर, गजानन साबळे, आनंद शिंपीकर, सचिन भोंडे, दिनेश क्षिरसागर, सुरेश तेटू, वामनराव दातीर, अंजूम परवीन मोहम्मद इक्बाल, देवेंद्र खंडारे, फिरोजाबी नियामत खान, शाहरूख अहेमद शेख नझिर, शिला शिंदे, गणेश वाघ, विश्वनाथ नामुर्ते, गुणवंत तायडे आदींचा सत्कार करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूमचे उद्घाटन
शासनाच्या 10 दिवसांच्या कृति कार्यक्रमांमतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम आणि हॅलो कलेक्टर संवाद उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वॉररूमच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचे ऑनलाईन निराकरण करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हास्तरावर चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे. हा उपक्रम निरंतर सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संपूर्ण मदत देण्यात यावी. नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक झाल्या हा उपक्रम यशस्वी ठरेल. अमरावती येथील हा उपक्रम यशस्वी झाल्यास या उपक्रमाची व्याप्ती राज्यभर करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केली आहे,
जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिक विविध विभागाच्या तक्रारी आणि निवेदने सादर करतात. याचा पाठपुरावा गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना संपर्क क्रमांक, क्यूआर कोड आणि ऑनलाईन तक्रार करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्या ऑनलाईन पद्धतीने संबंधित विभागाला पाठविण्यात येतील. विहित मुदतीत या तक्रारी निकाली काढण्यासाठी कक्षातर्फे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच नागरिकांना त्यांच्या तक्रारीची स्थिती पाहण्यासाठी ऑनलाईन सुविधा, तसेच ई-मेलद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
तक्रारीचे निरसन झाल्यानंतर नागरिकांना याबाबत अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. योग्य पद्धतीने तक्रारीचे झाले नसल्यास ती तक्रार पुन्हा विचारात घेतील जाणार आहे. या पद्धतीमुळे नागरिकांच्या समस्यांची घरबसल्या सोडवणूक शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी दिली.