परभणी, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून, रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे यांनी आज सेलू येथे दिली. तीन दिवसीय सेवा संकल्प शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता सानप, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, कार्यकारी संचालक महावितरण (प्रकल्प) धनंजय औंढेकर, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम आदी उपस्थित होते.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचे आयोजन सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.
सद्यस्थितीत या सेवा संकल्प शिबिरामध्ये तब्बल सहा हजारावर रुग्णांनी नावनोंदणी केली असून, येथे आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. रोगाचे निदान करताना एकही रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहणार नाही. मोतीबिंदू तसेच कर्करोगाचे निदान वेळीच करून घ्यावे. त्यासाठी वेळीच प्राथमिक चाचणी करून घ्यावी. सर्वांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे, असे आवाहन करत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, रुग्णांनी कर्करोगाची वेळेवर चाचणी, निदान व उपचार केल्यास सर्व नागरिक सदृढ राहतील, कोणतीही जीवितहानी होणार नाही. ती टाळता येईल, यासाठी आपण सर्वजण काम करूयात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात रुग्णांना डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व केंद्रांवर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे उत्कृष्ट सेवा पुरवतील. बोरी आणि जिंतूर येथील 30 बेडच्या रुग्णालयाला 100 बेडचे रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून, येथे कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याचा मानसही पालकमंत्र्यांनी बोलून दाखविला. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सेवा संकल्प शिबिर कार्यक्रम ठिकाणी विविध स्टॉल्सना भेटी दिल्या. तसेच आरोग्य शिबिराच्या ठिकाणी भेट देत रुग्णांची विचारपूस केली. तसेच पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी-नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यकारी संचालक महावितरण (प्रकल्प) धनंजय औंढेकर यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, वीजबिल कमी येण्यासाठी व स्वच्छ पर्यावरणाकरीता सूर्यघर योजना अतिशय चांगली आहे. विशेषत: या योजनेसाठी सबसिडी दिली जाते. प्रत्येकाने आपल्या घरावर या योजनेच्या माध्यमातून सोलार पॅनल लावून सौर ऊर्जेचा वापर करावा. घरातील सर्व उपकरणे या ऊर्जेवर चालतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन अवश्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवा संकल्प शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बचतगटांच्या महिलांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी असून त्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांनी दिली जात आहे. तसेच बचतगटाचे स्टॉलही येथे आहेत. सर्वच स्टॉलवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
दुधगाव सौर उर्जा प्रकल्पाचे ई-लोकार्पण सोहळा
जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे महावितरणकडून 4 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पद्वारे तयार होणारी हरित ऊर्जा 33/11 केव्ही दुधगाव उपकेंद्रशी जोडली गेली आहे. त्यामुळे उपकेंद्रातून दुधगाव, आसेगाव आणि कौडगाव या गावातील एकूण 394 कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास दर्जेदार व योग्य दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. या प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते आज ई-लोकार्पण करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी संस्थाकडून चार हजार दिनदर्शिका आणि सुंदर माझी अंगणवाडीला चार हजार वह्यांचे यावेळी वाटप करण्यात आले. तर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचा मोठ्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये राज्यातूर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
सेलूला राज्यातील प्रथम सौर सिटी बनविणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे
सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनवणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते आज नव्याने कार्यान्वीत झालेल्या महावितरण सेलू विभागाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ राजाराम माने, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता (सेलू) उमेश धोंगडे, अभियंता मंदार वग्यानी उपस्थित होते.
ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकिय सोयीकरिता परभणी विभाग क्र.1 व 2 ची पुनर्रचना करून परभणी विभाग व सेलू विभाग असे बदल करण्यात आले व परभणी विभाग क्र.2 चे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरीत करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
सेलू येथे १३२ केव्ही मंजूर झाले होते पण येथील अधिका-यांनी १३२ केव्हीची आवश्यकता नसल्याचा अहवाल पाठवला होता. असा अहवाल पाठविणारावर कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर -साकोरे यांनी सांगितले. सेलू येथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा व्यापार होतो. त्यामुळे येथे १३२ केव्हीची आवश्यकता आहे. गतिमान सरकारच्या टँगलाईननुसार वीज देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. ते काम तत्परतेने झाले पाहीजे. सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनवायचे आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मतदारसंघात ५० हजारावर नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे. सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केले.