‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास आणि शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत

मुंबई दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024’ अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास तसेच जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांची मुलाखत मंगळवार 15 एप्रिल 2025 तर जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांची मुलाखत बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी घेतली आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-2024 अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत शासकीय अधिकारी गटातून सर्वोत्कृष्ट उपक्रम या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अभिषेक नामदास यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाशी जोडण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच विभागांशी संबंधित अद्ययावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्याकरिता ‘DDMA चॅटबोर्ड’ प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना याप्रणालीमुळे कशाप्रकारे माहिती व मदत उपलब्ध होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती श्री. नामदास यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती नागलवाडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. श्रीमती नागलवाडे यांनी जिजामाता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगामुळे विद्यार्थी पटसंख्याच नव्हे तर विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यास देखील मदत झाली आहे. त्यांनी या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून शिक्षिका श्रीमती नागलवाडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/