अमरावती, दि.11 (जिमाका ): राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.
श्री. भरणे यांनी संकुलातील खेलो इंडिया आर्चरी सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, ज्युदो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन बहुउद्देशीय हॉल, जिम, कार्यालय आणि बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली.यावेळी मंत्री श्री.भरणे यांनी संकुलातील सुविधांवर समाधान व्यक्त केले.
अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करता येतील, अशा प्रकारच्या विविध क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातील. या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावती विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आर. व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आदि उपस्थित होते.
हव्याप्र महाविद्यालयाच्या दीक्षान्त समारोह कार्यक्रमाला उपस्थिती
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत चालविले जाणारे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालयाचा 11 व्या दीक्षान्त समारोह कार्यक्रमाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा क्षेत्रात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य तळमळीने आणि अव्याहतपणे सुरू आहे. हव्याप्रला क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत शासनामार्फत करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी यावेळी संस्थेची कारकीर्द सांगितली. श्री. असनारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली.