नाशिक, दि. 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा मध्यवर्ती बँकचे जवळपास 50 हजार शेतकरी सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांची बँकेतील खाती सुरू करून खात्यावर व्यवहार सुरू करावेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यास बँकेस उर्जितावस्थेस प्राप्त होईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा मध्यवती बँक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, खासदार शोभा बच्छाव, खासदार पराग वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.राहूल आहेर, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहेर, माजी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक बाळासाहेब आनासकर, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, बँकेचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक सुरळीत होण्याच्या दृष्टीने बँकेविषयी शेतकऱ्यांच्या मनातील असलेले संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या तीन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून कोणऱ्याही प्रकारची सक्तीची वसूली न करण्याचे निर्देश कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सहकार विभाग व बँक प्रशासकांना दिले. येणाऱ्या आठवडाभरात शेतकऱ्यांसाठी नवीन ओटीएस स्कीम सुरू करणार असून मयत शेतकरी सभासदांच्या वारसांसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व्याजदर आकारणीबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील. जिल्हा मध्यवर्ती बँक खाते सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभही येणाऱ्या काळात डिबीटी माध्यमातून प्रदान करण्यात येतील. शेतकऱ्यांमध्ये बँकेबाबत विश्वासाहर्ता निर्माण होण्यासाठी सर्व संचालक बँकेत पाच लाख रूपयांच्या ठेवी जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आढावा
कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, खासदार शोभा बच्छाव, खासदार पराग वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.राहूल आहेर, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहेर, माजी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने मागील अनुभव पाहता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मौजे बोरखिंड येथे आगमन व निर्गमन निर्माण करून बोरखिंड ते नाशिकला जोडणारा पर्यायी रस्ता मंजूर करण्यात यावा. यामुळे नाशिक- पुणे व मुंबई-आग्रा हायवे वरील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास मदत होईल. सिन्नर- नायगाव जोगलटेंभी हा चौपदरी क्राँक्रीट रस्ता तयार करून गोदावरी नदीवर दारणासांगवीला जोडणाराा मोठा पूल बांधण्यात यावा व दारणासांगवी ते नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडरस्ता करून पंचवटीला जोडणार अत्यंत जवळचा पर्यायी मार्ग निर्माण केल्यास गोदावरी-दारणा संगमावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईल, अशा सूचना कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.