केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि. ११ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबई मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या सृजनशील उद्योगास जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची (आयआयसीटी) स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश आहे. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, त्याचा लौकिक जगभरात होणार आहे. आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता, डिजिटल कंटेंट, व्हीएफएक्स, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरी टेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील संशोधन व प्रशिक्षणात कार्यरत असेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

0000