डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले. ब्रिटिश सरकारच्या म्हणजे प्रांतीय मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री होते त्यामुळे दिल्लीत त्यांचे वास्तव्य असायचे. या काळात ते देशभर फिरत होते. जनतेच्या समस्या जाणून घेत होते आणि मंत्री म्हणून त्यावर निर्णय घेत होते.
दिल्लीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले. याच काळात, म्हणजे दिल्लीत असताना त्यांनी देशावर दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेतले. मग ते कामगार कायदे असोत की महिलांच्या अधिकाराचे निर्णय असोत. याच काळात बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून राज्यघटनेचा मसुदा तयार केला तसेच त्यानंतर हिंदू कोड बिल तयार केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दिल्लीत आलेत तेव्हा ते एकटे राहत असत. माता रमाईचे निधन झाल्यानंतर तसे बाबासाहेब खूप दुखावले होते. पण आपल्या प्रकृतीच्या तपासणीसाठी त्यांचे मुंबईला नियमितपणे वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जावे लागत असे. तिथेच डॉक्टर मालवणकर यांच्याकडे डॉ सविता कबीर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली आणि त्यांचे कोर्ट मॅरेज झाले. याच काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनेक ग्रंथाचे लिखाण केले. देशाच्या फाळणीवरील त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी दिल्लीतच पूर्ण केला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा जगप्रसिद्ध असलेला ग्रंथ “बुद्ध आणि त्यांचा धम्म ” दिल्लीतच लिहीला. या काळात दिल्लीतील लोकांशी त्यांचे संबंध आले. हे नाते दृढ होत गेले.
उत्तर भारतीयांचा गोतावळा त्यांच्या भोवती असायचा. त्यांना बघायला, ऐकायला, भेटायला लोक सतत येत असत. सुरूवातीला बाबासाहेब यांचे निवास 1 हाार्डिंग एवेन्यु (गुबंद कोठी) येथे होते. सध्या याला टिळक मार्ग म्हणतात. त्यांचे शेवटचे दिवस सीव्हील लाईन्स येथील 26 अलीपुर रोड येथील कोठीत गेले. भारत सरकारने बाबासाहेब यांच्या स्मरणार्थ या ठीकाणी मोठे स्मारक बांधले आहे.
दिल्लीत असताना बरेच लोकांचा त्यांच्या परीचय झाला. हा ऋणाणुबंध वाढला. बाबासाहेबांना बरेच लोक आपले सुख दु:ख सांगत असत. बाबासाहेब यांच्या आऊट कार्टरमध्ये त्यांचे निकटवर्ती सोहनलाल शास्त्री, जे विधी विभागात अधिकारी होते, ते राहत असत. त्यांचा बाबासाहेबांशी जवळीकतेचा स्नेह होता. त्यांच्या जवळचे असलेले चौधरी देवीदास जी यांचे ही बाबासाहेब यांच्या दिल्लीतील घरी येणे जाणे होत असे. चौधरी देवीदास यांचा मुलगा लाला हरीचंद आणि सुन भुरिया देवी यांना 2 ऑक्टोबर 1949 रोजी पुत्र रत्न झाले आणि या बालकाचे नाव गुलाब सिंग असे ठेवण्यात आले. ही आनंदाची बातमी बाबासाहेबांना दयायची होती. त्या दिवशी बाबासाहेब दिल्लीत नव्हते. ते दोन दिवसांसाठी काश्मीर दौऱ्यावर होते. बाबासाहेब काश्मीरहून परत आल्यावर कळाल्यावर चौधरी देवीदास यांनी लाडुचा डबा घेऊन बाबासाहेबांचे घर गाठले. तेव्हा बाबासाहेब त्यांच्या मित्र आणि आप्तांसोबत चर्चेत दंग होते. बाबासाहेबांनी चौधरी देवीदास यांना गेटमधून येताना बघून देवीदास यांचे अभिवादन स्वीकारले. देवीदास हे अंत्यत हर्षामध्ये बाबासाहेबांना सांगू लागले की त्यांना नातु झालेला आहे. मिठाई त्याच्या आनंदात आणली आहे. बाबासाहेबांना मधुमेह असल्यामुळे त्यांनी ती खाल्ली नाही मात्र, सोबत असणाऱ्यांमध्ये वाटून दिली. नातवाचे नाव गुलाब सिंग ठेवण्यात आले असल्याचे चौधरी नी बाबासाहेबांना सांगितले. त्यावर बाबासाहेब यांनी शुभेच्छा देत विचारले, आई आणि बाळ दोघेही बरे आहेत ना. यावर चौधरी यांनी होकारार्थी उत्तर दिले.
बाबासाहेब म्हणाले, गुलाब सिंग हे नाव काही बरे वाटत नाही. त्यांनी बाजुला ठेवलेले वर्तमान पत्र उचलले, त्यात शांतीस्वरूप हे नाव वाचले आणि चौधरी यांना सांगितले की आता तुझ्या नातवाचे नाव गुलाब सिंग हे न ठेवता तु शांतीस्वरूप असे ठेव. त्याप्रमाणे चौधरी देवीदास यांनी कागदोपत्री नाव बदलून शांतीस्वरूप हे नाव ठेवले.
पुढे शांतीस्वरूप यांनी भारत सरकारच्या गृह खात्यात नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ‘सम्यक’ या नावाने प्रकाशन संस्था सुरू केली. उत्तर भारतातील नवोदित लेखकांना त्यांनी संधी दिली. वर्ष 2020 मध्ये त्यांचे निधन दिल्ली येथे झाले. आताही त्यांची प्रकाशन संस्था आहे. हयात असेपर्यंत ते सर्वाना मोठया अभिमानाने सांगत, माझे ‘शांतीस्वरूप’ हे नाव बाबासाहेबांनी ठेवले आहे. अशा अनेक आठवणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील आहेत.
प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वच स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. आजही राजधानीत त्यांच्या आठवणी संसदेपासून ते दिल्लीतील लोकांमध्ये जाग्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !
अंजु निमसरकर-कांबळे माहिती अधिकारी
0000000
अंजु निमसरकर/ विशेष लेख /दि.11.04.2025