गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सहकारी बँकांमधूनही होणार कर्जपुरवठा;
येत्या पंधरा दिवसांत शासन निर्णय काढण्याची उद्योग मंत्र्यांची ग्वाही
सीएमईजीपी मध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे केले कौतुक
आयटी पार्क साठी उद्योग मंत्र्यांनी सहकार्य करण्याचे तसेच जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी उद्योजकांनी योगदान देण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. १२ (जिमाका): कोल्हापुरातील आयटी पार्क साठी ज्या दिवशी जागा निश्चिती होईल, त्याच दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांबरोबरच यापुढे सहकारी बँकांमधूनही कर्जपुरवठा ग्राह्य धरण्यात येण्याबाबतचा शासन निर्णय येत्या पंधरा दिवसात काढण्यात येईल. त्याचबरोबर भविष्यात अधिकाधिक दर्जेदार उद्योग प्रकल्प कोल्हापुरात उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद-2025 हॉटेल दि फर्न येथे उद्योग मंत्री श्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष तथा नंबर वन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योग आणि कृषी चे अध्यक्ष ललित गांधी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उद्योग परिषदेला माजी आमदार सुजित मिणचेकर, पुणे विभागाचे सह संचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामंजस्य कराराचे आदान प्रदान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ती व उल्लेखनीय काम केलेल्या विविध बँकर्सना मंत्री श्री सामंत व पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आजच्या गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योग क्षेत्रावर 80 ते 85 टक्के गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. उद्योग क्षेत्रात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून ४ हजार कोटींचे करार करण्यात यशस्वी झाले आहे. राज्यात मेगा व अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणले आहेत. मागील वर्षा पेक्षा तिप्पट गुंतवणूक उद्योगक्षेत्रात वाढत आहे. यावरूनच उद्योजकांचा उद्योग क्षेत्रावर असणारा विश्वास लक्षात येतो.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पहिल्या वर्षी १२ हजार दुसऱ्या वर्षी १२ हजार तर तिसऱ्या वर्षी २३ हजार उद्योजक म्हणजे जवळपास ४० हजार उद्योजक या कार्यक्रमातून तयार झाले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक उद्योजक तयार करण्यात शासनाला यश आले आहे. या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने उद्योग निर्मितीसाठी युवक युवतींना कर्ज पुरवठा करुन या योजनेची उद्दिष्टपूर्ती केल्यास राज्यात लाखो उद्योजक तयार होतील. यासाठी दर्जेदार कार्यशाळांचे आयोजन करावे, असे सांगून कोणताही उद्योग उभारताना उद्योजकांनी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोणतीही योजना यशस्वी होण्यात त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असते. कोल्हापूर जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाल्याबद्दल मंत्री श्री. सामंत यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे कौतुक केले.
खादी ग्रामोद्योग विभागामार्गत शुद्ध मध निर्मितीला चालना दिली जात असून या माध्यमातून मध उत्पादक शेतकऱ्यांना दरमहा किमान 15 हजार रुपये उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी उद्योजकांनी योगदान द्यावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या उद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये सध्या केवळ राष्ट्रीयकृत बँकांमधूनच कर्ज पुरवठा केला जातो. बेरोजगार युवक युवतींना अधिकाधिक रोजगार निर्मिती होण्यासाठी सहकारी बँकांमधूनही कर्ज पुरवठा होण्याबाबत शासन निर्णय काढण्याचे आवाहन त्यांनी केले. यावर येत्या पंधरा दिवसात हा शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री श्री. सामंत यांनी कार्यक्रमात दिले.
उद्योग क्षेत्राला पोषक वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शहरात आयटी पार्क उभारण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील असून आयटी पार्कचा शासननिर्णय काढून या कामाला गती देण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी सहकार्य करावे. तसेच जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यकम ही महत्वाकांक्षी योजना सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतीना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑगस्ट 2019 पासून उद्योग संचालनालयाने सुरु केली आहे.
मागील वर्षी (सन २०२३-२४) योजनेअंतर्गत १२०० लाभार्थीचे उद्दिष्ट शासनाने जिल्ह्याला दिले होते. त्यानुसार १२२२ नव उद्योजकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला असून राज्यात उच्चांकी उद्दिष्ट पूर्ती साध्य झाली आहे. १२२२ एवढ्या लाभार्थ्यांना ७० कोटी ४७ लाख रक्कमेचे अनुदान मंजूर करण्यात आले असून ३५ कोटी २२ लाख रक्कमेचे अनुदान लाभार्थीना प्रत्यक्षात कर्ज रक्कमेसह वितरित करण्यात आले आहे. शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत योजना सुरुवातीपासून ३५५३ लाभार्थीना कर्ज मंजूर केले असून त्याअंतर्गत १९९ कोटी ४१ लाख रक्कमेचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्याबरोबरच या योजनेतून सुरुवातीपासून १८७० लाभार्थीना ११४ कोटी ३६ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. हे प्रमाण सुध्दा जिल्ह्याचे उच्चांकी आहे.
गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६०कोटी रुपयांचे सामंजस्य करार
आजच्या गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे एकूण ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये एकूण ८ हजार ५५० रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात प्रामुख्याने मे.एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड इंजीनियरिंग १२५ कोटी मे.अरविंद पाटील इंडिया लिमिटेड टेक्सटाईल १२५ कोटी मे.तेजस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड फाउंड्री उद्योग ११५ कोटी मे.नेक्स्ट लाइव प्रायव्हेट लिमिटेड इंजिनिअरिंग १०५ कोटी व मे आरिहंत टेक्समो स्पिन टेक्सटाईल १०५ कोटी अशा उद्योग घटकांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून युवक-युवतींना उद्योजक बनविण्यासाठी सक्षम करणाऱ्या आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग, सेवा प्रवर्गात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी व नवउद्योजकांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रात भविष्यात होणाऱ्या गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करुन त्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक, शैक्षणिक, वित्तीय संस्था, पायाभूत सुविधा, कृषी, पर्यटन, आरोग्य, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, मैत्री, मित्रा, शिवाजी विद्यापीठ, भारतीय पोस्ट, तंत्रनिकेतन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच बँक, सिडबी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स, कौशल्य व रोजगार विभाग, शासकीय इत्यादी संस्थांनी सहभाग दिला.
*****