घटनाकार बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर जयंती; लोकशाही बळकटीसाठी राष्ट्रहित प्रथम, तर व्यक्तिपूजा नकोच

भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांचा उदय म्हणजे उपेक्षित, तेजोहिन अन् सामाजिक चेहरा नसलेल्या समाजघटकांमध्ये मानवी हक्कांबद्दल जागृतता निर्माण करणाऱ्या क्रांतीसूर्याचे उदयच म्हणावे.

जाती-पातीच्या विषमतेवर मनुवादी समाजव्यवस्थेतून शेकडो वर्षे गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या दलित-पददलित मागास लोकांना नवा सामाजिक चेहरा देण्याचं व त्यांना बोलकं करण्याचं ऐतिहासिक कार्य महानायक बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी केलं.त्यातून  तथाकथित समाजातली वर्णव्यवस्था व जातीभेदाचे समूळ उच्चाटन करत देशात सामाजिक समता प्रस्थापित केली. अशा युगपुरुष  विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त सर्वधर्मीय भारतीयांची भावपूर्ण आदरांजली!

सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या बाबासाहेबांचे स्थान आजही आधुनिक भारताच्या इतिहासात सह्याद्रीसारख अढळ आहे. अखिल मानवजातीला सामाजिक समतेचा संदेश देणारे महामानव बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जयंती दिन कॅनडा सरकारने मागील वर्षी “समता दिन” म्हणून देशात साजरा करण्याचा निर्णय घेतला.याबद्दल आम्ही भारतीय कॅनडा सरकारचे आभार प्रकट करतो विश्वरत्न बाबासाहेब डॉ . भिमराव आंबेडकर हे केवळ भारतालाच नव्हे तर,साऱ्या जगताला हवे हवेसे वाटायचे.मागील काळात ऑक्सफर्ड विद्यापीठाने जगातील १०० महान विद्वानांची यादी तयार केली होती,त्यात बाबासाहेबांचे नाव अग्रभागी होते,ही गोष्ट भारतीयांच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे.

दलित पददलित मागास समाजाचे नव्हे तर मानव  तेचे कैवारी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील *महू* येथे सुभेदार रामजी मालोजीराव आंबेडकर यांच्या कुटुंबात झाला अन् जणू ज्ञानाचं एक नवं विद्यापीठ नावरूपाला आलं.वंदनीय भीमाबाई ह्या बाबासाहेबांच्या मातोश्री, बाबासाहेब हे पाच वर्षाचे असतानाच त्या दिवंगत झाल्या.परिणामी बाबासाहेबांचं मातृछत्र बालपणीच विरून गेलं.पिताश्री सुभेदार रामजी हे लष्करात नोकरीला होते.इतकेच नव्हे तर,बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव हे देखील लष्करात होते.खरं तर,त्यांनी राष्ट्रसुरक्षेसाठी आपलं सारं जीवन समर्पित केलं.पुढे त्यांचेच सुपुत्र भीमराव उर्फ बाबासाहेब डॉ. आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार बनून स्वतंत्र भारताचे भाग्यविधाता झाले. वास्तवात आंबेडकर कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील *आंबावडे* गावचे मुळ रहिवाशी.दरम्यान वडिलांचे निधन झाल्यावर थोरले बंधू आनंदराव यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज या द्वय महापुरुषांनी बाबासाहेबांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन मोलाची मदत केली.त्यांनाही आमचा त्रिवार मानाचा मुजरा!

वंदनीय बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाई भिमराव आंबेडकर यांनी आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांना भक्कम साथ दिली.बाबासाहेबांच्या त्या खऱ्या अर्थाने सावलीच होत्या.संघर्षमय अन् स्वाभिमानी जीवन जगत अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.दरम्यान बाबासाहेब आजारी पडले असता,ते हॉस्पिटलमध्ये दाखल असताना,तेथे त्यांची देखभाल करणाऱ्या डॉ.सविता कबीर यांच्याशी ओळख झाली अन् पुढे त्याचं रूपांतर सन १९४८ मध्ये विवाहात झालं.असा हा संमिश्र जीवन प्रवास युगपुरुष बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा राहिला.ते स्वतः स्वाभिमानाने जगले अन् आपल्या अनुयायांनादेखील स्वाभिमानाने जगण्याची दीक्षा दिली.म्हणूनच त्यांना महामानव म्हणून संबोधिले जाते.

समाजातील गोरगरीब, उपेक्षित,दलित-पददलित, मागासवर्गीय प्रवर्गातील विभिन्न जाती-जमातीतील लोकांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रथम आपल्याला उच्च शिक्षित व्हावे लागेल,हे जाणून बाबासाहेबांनी विभिन्न शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्याचा दृढनिश्चय केला. अशाप्रकारे त्यांनी विद्वत्ता, कठोर परिश्रम,जिद्द,चिकाटी च्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.केंब्रिज,ऑक्सपर्ड सारख्या जागतिक दर्जाच्या नामवंत विद्यापीठांमध्ये विविध सामाजिक शास्त्रांमध्ये एम.ए.(अर्थशास्त्र,राज्य शास्त्र,समाजशास्त्र) केलं.त्यानंतर त्यांनी *दि प्रॉब्लेम ऑफ रुपी* या प्रबंधातून पी.एचडी.संपादन केली.पुढे त्यांनी डी.लिट.(उस्मानिया विद्यापीठ),डी.एस्सी., एम.एससी.,एल.एल डी(कोलंबिया विद्यापीठ) व बॅरिस्टर आदी उच्चतम पदव्या आपल्या कठोर परिश्रम अन् बुद्धिमत्तेच्या जोरावर संपादन केल्या.त्यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी प्राध्यापकाची नोकरीही केली.ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ,थोर राजनितिज्ञ व समाजशास्त्रज्ञ,चतुरस्त्र संपादक-पत्रकार,लेखक, साहित्यिक,घटनातज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ अशी बाबासाहेबांची बहुआयामी ओळख देशासह जगभरात आजही आहे.कारण त्यांनी भारतीय राज्यघटनेसह गतकाळात स्वतंत्र झालेल्या अनेक देशांना घटना तयार करताना नि:स्पृहपणे मोलाची मदत केली.म्हणूनच बाबासाहेब यांच्या कार्याचा ठसा जगभरात आहे.

शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा,या उद्देशाने बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज तर,मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज,लॉ कॉलेज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स,कॉमर्स महाविद्यालय सुरू केलीत. तसेच महाड,दापोली,पंढरपूर,नांदेड आदी ठिकाणी सुमारे २० हून अधिक शैक्षणिक संस्था स्थापन केल्यात. बाबासाहेबांनी गोरगरीब,गरजू,

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व मागास घटकांसाठी शैक्षणिक सोयी-सुविधा व शिष्यवृत्त्या जाहीर करून त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी केली.महत्वाचे म्हणजे मागासवर्गीयांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जणू जाळेच विणले.इतकेच नव्हे तर दलित-पददलित, मागासवर्गीय समाज बांधवांना शिका,संघटित व्हा व संघर्ष करा हा पथदर्शक संदेश दिला. मागासवर्गियांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांच्याकरिता राज्यघटनेत आरक्षण व बढतीच्या तरतुदी केल्या.जेणेकरून शेकडो वर्षांपासून पिछाडीवर राहिलेला मागास समाज राष्ट्राच्या मुख्यप्रवाहात सामील होऊ शकेल.खरं तर,बाबासाहेब हे मागासवर्गीयांचे नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे आधारवड होते.

शिक्षणतज्ञ बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मागास समाजातील निरक्षरता दूर करण्यावर आपलं सारं जीवन वेचलं.या पार्श्वभूमीवर  मागासवर्गीयांना *शिकाल तर टिकाल* हा मोलाचा सल्ला दिला.गोरगरीब मागास घटकांच्या पाल्यांना अभ्यासाची व अन्य विषयांची पुस्तके सहजपणे उपलब्ध व्हावीत,या उद्देशाने बाबासाहेबांनी दादर येथील त्यांच्या राजगृह निवासस्थानी विविध विषयांची सुमारे ५०,००० पुस्तकांचे ग्रंथालय उभारले आहे.वास्तविक पहाता, बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी व्यतित केलं.ते खऱ्या अर्थानं  तमाम मागासवर्गीयांचे भाग्यविधाता होते.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे घटनाकार बाबासाहेब डॉ.आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते.शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये अनेकदा आवाज उठविला.त्यांच्या मते, भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो,कर्जात जगतो अन् कर्जातच मरतो यासाठी व्यवहार्य मार्ग म्हणजे सामुदायिक शेतीचा प्रयोग करून जे उत्पादन येईल,त्यातील सरकारचा हिस्सा वगळून,उर्वरित उत्पादन शेतकऱ्यांना सम -समान पद्धतीने वाटप करावे,असा मोलाचा सल्ला बाबासाहेबांनी सरकारला दिला.कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग क्षेत्रावर भर दिला गेला पाहिजे.सरकारने कृषीपूरक उद्योग उभारले पाहिजेत,जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.कृषी उत्पन्नावर कर लावू नये. शेतकऱ्यांविषयीचा सरकारचा दृष्टिकोन  पारदर्शक व सकारात्मक असावा.त्यांचे सर्वांगीण हित जपणारा असावा.”शेती” हा सरकारी धंदा(व्यवसाय)म्हणून असावा,असे त्यांचे प्रामाणिक मत होते.कारण त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची झळ थेट बळीराजाला पडू शकणार नाही. छोटे अल्पभूधारक,कोरडवाहू शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर  बाबासाहेबांनी लोकसभेत परखड अन् रोखठोक मतं मांडली होती.सरकारने    “अन्नदाता” शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत हित जपावे,हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा.त्यांनी सदैव बळीराजाची पाठराखण केली,कारण ते शेतकऱ्यांचे भाग्यविधता होते.

केंद्रीय कायदा मंत्री असताना बाबासाहेबांनी स्री शिक्षण, स्री-पुरुष समानता अन् स्री स्वातंत्र्यावर अधिक भर दिला.तसेच महिलांच्या हितासाठी वीसहून अधिक कायदे केलेत.हिंदू मॅरेज ॲक्टचे निर्माते खऱ्या अर्थानं बाबासाहेबच आहेत.कायद्याद्वारे वडिलांच्या संपत्तीत मुलीला लग्नानंतरही मुलाबरोबरीचा समान हक्क प्रदान केला.. तो बाबासाहेबांनीच.स्री शिकली तर,कुटुंबासह समाजाला शिक्षित करण्याची तिच्यात धमक असल्याचे बाबासाहेबांचे ठाम मत होते.महिलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून आत्मनिर्भर बनविण्याचं अन् स्वाभिमानाचं जीवन जगण्याची सकल स्त्री जातीला त्यांनी दिशा दाखविली.परिणामी आज महिला सबलीकरण होऊन त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आघाडी घेतांना दिसत आहेत.महिलांना राजकारणात पुरेसं अन् योग्य स्थान द्या,असा सल्लाही त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.महिला ह्या देशाचा राज्यकारभार निष्ठापूर्वक,सक्षमपणे व कर्तव्यबुद्धीने करू शकतात,याचा त्यांना विश्वास होता.वास्तवात बाबासाहेब हे स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने चालविण्यासाठी राज्यघटनेची आवश्यकता असते,हे जाणून घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष नेमून भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी सोपविली.याशिवाय मसुदा समितीत काही तज्ज्ञ मान्यवरांची देखील सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.या समितीने विविध देशांचे दौरे केले.अन् तेथील राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून त्यातील आपल्या देशास उपयुक्त असणाऱ्या तरतुदी संकलित केल्या.तब्बल २ वर्षे,११ महिने,१८ दिवस विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केल्यावर देशांतर्गत दौरे करुन राज्यांमधील भौगोलिक परिस्थिती,संस्कृती,जीवन पद्धती,रीतिरिवाज,भाषा आदी बाबींचा सखोल अभ्यास करून अंतत: भारतीय संविधान नावरूपाला आले अन् २६ नोव्हेंबर १९४९ रोजी त्याला मान्यता मिळून,त्याद्वारे २६ जानेवारी १९५० पासून  स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने हाकण्यास प्रारंभ झाला.त्या दिवसापासून भारतात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

भारतीय नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य(जीवन जगण्याचे स्वातंत्र्य),विचार स्वातंत्र्य(अभिव्यक्ती स्वातंत्र्य),धार्मिक स्वातंत्र्य, उदरनिर्वाहासाठी व्यवसाय-नोकरी करण्याचे स्वातंत्र्य,न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य,शिक्षण स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार(हक्क) राज्यघटनेच्या माध्यमातून बहाल करण्यात आले.या हक्कांचा उपभोग घेताना प्रत्येक नागरिकाने इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही,याची पुरेपूर खबरदारी घ्यावी,असं त्यांनी राज्यघटनेत प्रकर्षाने नमूद केलं.मूलभूत हक्कांसह राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीवही घटनेच्या माध्यमातून नागरिकांना करून देण्यात आली.

लोकसभा,विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पसंदीचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वधर्मीय स्त्री- पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.याशिवाय वरील संवैधानिक संस्थांमध्ये विविध मागासवर्गीय प्रवर्गांसाठी लोकसंख्येच्या निकषांवर राखीव जागा ठेवण्यात आल्या.घटनाकार बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी समाजातील आहे रे अन् नाही रे यातील दरी मिटवून सामाजिक समता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला.वास्तविक पहाता, बाबासाहेबांनी आपलं सारं आयुष्य देशात *स्वातंत्र्य, समता व बंधुता* प्रस्थापित करण्यासाठी पणाला लावलं.अत: बाबासाहेब हे सच्चे देशभक्त अन् सामाजिक समता प्रस्थापित करणारे महान  समाजसुधारक होते,हे केवळ भारतानेच नव्हे तर,जगाने शिक्कामोर्तब केलं याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यास अनन्यसाधारण महत्व असते. बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांच्या पत्रकारितेला १९२० मध्ये प्रारंभ झाला.*पंखाशिवाय पक्षी जसा आकाशात भरारी मारू शकत नाही.त्याप्रमाणेच वृत्तपत्राशिवाय लोकशाहीला पूर्णत्व येऊ शकत नाही*.कारण लोकशाही राज्यपद्धती म्हणजे लोकांसाठी,लोकांनी निवडलेले,लोकांचे राज्य असते.लोकशाही राज्यपद्धतीत सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात.सरकारच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये काही उणिवा असल्यास,वृत्तपत्रे त्याविरुद्ध वाचा फोडून सरकारला संबंधित निर्णय

लोकहितासाठी बदलण्यास बाध्य करतात.खरं तर, बाबासाहेबांनी पारतंत्र्याच्या काळात लोकजागृती व लोकशिक्षणासाठी आपल्या वृत्तपत्रांचा वापर केला.त्याप्रमाणेच मागास वर्गीय समाजघटकांना आपल्या मानवी अधिकारांची जाणीव व्हावी,त्यांना शिक्षणाचे महत्व कळावे अन् मागासवर्गीयांना आपल्या हक्कांसाठी लढण्याची ऊर्जा निर्माण करण्याचे अहमकार्य बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलं.समाजातील दुर्लक्षित,उपेक्षित मागास वर्गीय घटकांचा आवाज बनून त्यांना बोलकं करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक,बहिष्कृत भारत,एकता,प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली.त्याद्वारे बाबासाहेबांनी वंचित व उपेक्षित लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली.याशिवाय मागास  पददलितांना मानसिक,बौद्धिक व आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र या आयुधचा अचूक प्रयोग केला.त्याची परिणती म्हणजे दलित,पददलित व मागासवर्गीयांमध्ये मानवी हक्कांची जाणीव निर्माण झाली.

बाबासाहेब हे संसदिय लोकशाही शासनप्रणालीचे पूजक होते.राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना घटनाकार म्हणतात,”सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी केवळ घटनात्मक मार्गांचाच वापर करावा.घटनेशी प्रामाणिक राहून स्वहितापेक्षा राष्ट्र हिताला प्राधान्य द्यावे.लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यक्तीपुजेला थारा न देता,राष्ट्र विकासाला प्राथम्य द्यावे.प्रजासत्ताक राज्याच्या निर्मितीसाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जोड द्यावी.भारताचे सार्वभौमत्व,अखंडता व एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी राज्यकर्त्यांनी सर्वंकष प्रयत्न करावेत.आपले राज्य  धर्मनिरपेक्ष असल्याने प्रत्येकाने दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा.कुठल्याही घटनात्मक प्रमुखाने  राज्यकारभार करताना विशिष्ठ धर्माला झुकते माप देऊ नये,तर सर्व धर्मांना समान लेखावे.राज्यकर्त्यांनी जाती-धर्माच्या नावावर भेदाभेद करू नये. राज्यघटना,राष्ट्रध्वज अन् राष्ट्रगीत यांचा राज्यकर्ते व सर्वधर्मीय नागरिकांनी सन्मान करावा.यातूनच भारतीय संसदिय लोकशाही  ही जगात आदर्श राज्यप्रणाली ठरेल,हे निश्चित”.

घटनाकार बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करून सामाजिक समता प्रस्थापित केली.याबद्दल सर्वधर्मीय लोक बाबासाहेबांचे सदैव ऋणाईत राहतील.परंतु भारताला स्वातंत्र्य मिळूनही जातीपाती-धर्माच्या नावावर दलित-पददलितांवर जो अन्याय झाला,

याबद्दल बाबासाहेबांना मनस्वी दुःख होत असे. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश नाकारणे,महाडचे चवदार तळे जे अनेक वर्षांपासून दलितांसाठी बंद होते,अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर असो वा पुण्याचे पार्वती टेकडीवरील मंदिरात दलितांना प्रवेश बंदी ह्या अमानवीय घटनांमुळे बाबासाहेबांचे मन उद्विग्न झालं.या असामाजिक कृत्यांविरुद्ध त्यांनी जागोजागी तीव्र जनआंदोलने करून अखेर दलितांना या स्थळांमध्ये प्रवेश मिळवून दिला.दरम्यान आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायींसह नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला.बाबासाहेब हे मानवतावादी विचारांचे युगपुरूष होते.या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सामंजस्याच्या भूमिकेतून दादरमधील इंदू मिलच्या प्रांगणात बाबासाहेब डॉ.आंबेडकरांचे स्मारक उभारलं जात आहे.खरं तर,हीच खरी युगपुरुष बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.

0000