जिल्ह्यात उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने काम करा – उद्योग मंत्री उदय सामंत

जिल्हा गुंतवणूक परिषदेला उत्तम प्रतिसाद; ९३० कोटींचे सामंजस्य करार

बीड, दि.16 (जि. मा. का) बीड जिल्ह्यात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न करावेत तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी काम करावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत केले. आज त्यांच्या उपस्थितीत 930 कोटी 11 लाख रुपयांचे करार झाले.

उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या या परिषदेचे आयोजन केले होते. येथील ग्रॅड यशोदा हॉटेलमध्ये ही परिषद झाली.

जिल्ह्यातील 74 उद्योजकांनी केलेल्या या करारामुळे थेट तसेच अप्रत्यक्षरित्या 6036 जणांना रोजगार प्राप्त होणार आहेत.

दीप प्रज्ज्वलनाने या परिषदेची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार सांदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता गावंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक तसेच अनिल जगताप, राजेश देशमुख, उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव, व्यवस्थापक विजय काकड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही. फताटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव इनकर व विश्वमाला इनकर यांनी केले.