महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीवेतनासह इतर थकबाकी रक्कम तातडीने वितरित करावी -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीवेतनासह आणि इतर थकबाकी रक्कम तातडीने वितरित करण्यात यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

निर्मल भवन येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, वित्त विभागाचे संचालक सिताराम काळे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, निधी उपलब्ध असून तो तातडीने वितरित करावे. सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, यावर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच ८० आणि ९० वर्षांवरील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम देणे अत्यावश्यक असल्यामुळे त्यावरही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

००००

राजू धोत्रे/विसंअ