बिसूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पावणेनऊ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण

सांगली, दि. २१ (जि. मा. का.) :  जलजीवन मिशनसारख्या योजनेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत बिसूर गावच्या ४.७५ कोटी रुपये रकमेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व ४ कोटी रुपये रकमेच्या बिसूर- कर्नाळ रस्त्याच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, बिसूर गावचे सरपंच सतिश निळकंठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूर्वी एखादा चित्रकार ग्रामीण भागातील महिलांचे चित्र रेखाटताना; तिच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आणि आसपास कोठेही पाण्याची व्यवस्था नसल्याने तिची वणवण दाखवायचा. मात्र जलजीवन मिशनमुळे आज ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण थांबल्याने, महिलांचे श्रम संपले आहेत, अन् महिलांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, शहरातील अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडे जाण्याचा ओढा वाढलेला आहे. मात्र गावातही अशा सुविधा निर्माण केल्यास, शहराकडे जाण्याचा ओघ कमी होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्या अनुषंगाने प्रयत्न केल्यास, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.‌

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, बिसूर गावासाठी पाणीपुरवठा योजना अतिशय महत्त्वाची होती. त्याचं भूमिपूजन आज होतंय, त्यामुळे याचा अतिशय आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सरपंच सतिश निळकंठ यांनी मनोगत व्यक्त केले.

बिसूरची वाढती लोकसंख्या आणि विस्तार यांचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर बिसूर हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. त्यामुळे थकबाकीमुळे वीज खंडित होऊन गावचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही.

  ०००००